तारापूर एमआयडीसीतील नॅपरॉड कंपनीला आग

0
24195

वार्ताहर/बोईसर, दि. 8 : तारापुर औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) एका औषध निर्मिती करणार्‍या कंपनीला आज, सोमवारी सायंकाळी अचानक आग लागल्याने कामगार वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर आजुबाजुच्या सर्व कारखान्यातील कामगार रस्त्यावर जमा झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण आणल्यामुळे यात कोणत्याही प्रकारची जिवीत हाणी झाली नाही.

तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर जे-17/1 व 70/3 वर असलेल्या नॅपरॉड या कारखान्यात आज सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल होऊन काही तासातच आग आटोक्यात आणण्यात आली. त्यातच कारखान्याच्या आवारात जागे अभावी अग्निशमन बंब जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्यामुळे आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना चांगलीच कसरत करावी लागली. विद्युत पुरवठ्यामधील शॉटसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, तारापूर एमआयडीसीत नेहमीच आगीच्या घटना घडत असल्याचे दिसत असुन आजच्या घटनेमुळे पुन्हा एकदा येथील कारखान्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments