कुपोषित बालकांच्या नावाने प्रोटीन खरेदी; ग्रामपंचायतींचा लाखो रुपयांचा गैरव्यवहार

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू दि. ८: डहाणू व तलासरी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी कुपोषित बालकांसाठी माय लाईफ स्टाईल या मार्केटिंग कंपनीकडून लाखो रुपयांची प्रोटीन पावडर खरेदी केली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार झाल्याचे समोर येत आहे. जव्हार तालुक्यामध्ये कोट्यावधी रुपयांची अशी प्रोटीन पावडर खरेदी झाल्याचे समजते.

माय लाईफ स्टाईल या मार्केटिंग कंपनीने प्रोटीन पावडर विकण्यासाठी अनेक एजंट नेमले असून या एजंटना १२ टक्के कमिशन मिळते. या शिवाय साखळीतील विविध टप्प्यातील लोकांना वेगवेगळे कमिशन मिळते. या व्यतिरिक्त जितकी पावडर खरेदी केली जाईल त्या रक्कमेच्या ३० टक्के कॅशबॅक दिला जाते. या ३० टक्के कमाईसाठी ग्रामपंचायतींकडून प्रोटीन पावडर खरेदी केली जाते. विशेष म्हणजे 250 रुपये किलो दराने बाजारात प्रोटीन पावडर उपलब्ध असताना 1900 रुपये प्रतिकिलो दराने माय लाईफ स्टाईलकडून खरेदी करण्यात आली आहे.

प्रोटीन पावडर खरेदीत पंचायत समिती स्तरावर देखील स्वारस्य दाखविण्यात येत असून डहाणू तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाबाराव भराक्षे यांनी दिनांक ३१ मे २०१९ रोजीच्या पत्राद्वारे सर्व ग्रामपंचायतींना पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्या चंद्रिका आंबात यांच्या परवानगी शिवाय व त्यांना कन्व्हिन्स केल्याशिवाय कुणालाही धनादेश देण्यात येऊ नयेत असे आदेश दिले आहेत. चंद्रिका आंबात यांच्या पत्राचा संदर्भ देऊन हे आदेश काढण्यात आले आहेत.

या पत्रातून ग्रामपंचायतीला भ्रष्ट्र मार्गाने मिळणाऱ्या ३० टक्के वरकमाईतून हिस्सा वसूल केला जात असल्याची शंका स्पष्ट होत आहे. ग्रामपंचायतींनी प्रोटीन पावडर खरेदीची बिले काढताना चंद्रिका आंबात यांची परवानगी घेणे आणि त्यांना कन्व्हिन्स करण्याची सक्ती का करण्यात आली? याचे समाधानकारक उत्तर भराक्षेंना देता आलेले नाही.

एकीकडे पंचायत समितीच्या पत्रामध्ये ज्या चंद्रिका आंबात यांची परवानगी घेणे आणि त्यांना कन्व्हिन्स करण्याची सक्ती करण्यात आली त्या चंद्रिका आंबात स्वतः माय लाईफ स्टाईल या मार्केटिंग कंपनीचे एजंट असल्याचे उघड झाले असून त्यांना शुभेच्छा देणारे आणि त्यांचा गौरव करणारे फोटो सोशल मिडियावरुन व्हायरल होत आहेत.

ग्रामपंचायतींनी प्रोटीन पावडर खरेदीची बिले काढताना चंद्रिका आंबात यांची परवानगी घेणे आणि त्यांना कन्व्हिन्स करण्याची गरज नसून नजरचुकीने दिनांक ३१ मे २०१९ रोजीचे पत्र काढण्यात आले. ते रद्द करुन सुधारीत पत्र काढू. – बाबाराव भराक्षे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती डहाणू

गटविकास अधिकारी यांनी हे पत्र चुकीच्या पद्धतीने लिहिले आहे. माझ्या नावाचा वापर करुन कोणी हे उत्पादन विकत असेल तर योग्य नाही. संबंधित ग्रामपंचायतीने योग्य ती खबरदारी घेऊनच व्यवहार करावा. माझे नाव सांगून कोणी परस्पर आल्यास मात्र माझ्याशी संपर्क साधावा अशा सूचना मी दिल्या होत्या. माझ्या नावाचा गैरवापर होऊन चुकीचे काही घडू नये यासाठी मी ही सूचना केली होती. मात्र त्याचा विपर्यास झाला आहे. – चंद्रिका आंबात, सदस्या, पंचायत समिती डहाणू

आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी घेतली दखल:
प्रोटीन घोटाळा प्रकरणी कुपोषित बालकांच्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार विवेक पंडित यांनी दखल घेतली असून याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे लक्ष वेधले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments