दिनांक 20 February 2020 वेळ 10:42 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » विकास आराखड्यास वाडावासियांचा विरोध!

विकास आराखड्यास वाडावासियांचा विरोध!

प्रतिनिधी/वाडा, दि. 29 : राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने पालघर जिल्ह्यासाठी विकास आराखडा जाहीर केला असून त्यात वाडा तालुक्यातील 20 गावांत विकास केंद्रे निर्माण करण्याचे धोरण जाहीर केले आहे. परंतु या विकास आराखड्यातील तरतुदी स्थानिक जनतेला अत्यंत जाचक असून अन्यायकारक असल्याने त्याला विरोध करण्यासाठी वाड्यात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत स्थानिक सरपंच व लोकप्रतिनिधींनी विकास आराखड्याला एकमुखाने विरोध दर्शविला.

वाडा तालुक्यात वाडा, कंचाड व खानिवली ही तीन विकास केंद्रे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत 28 महसूली गावांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र विकास आराखड्यातील जाचक अटींमुळे येथील नागरिकांना गावठाण जागेव्यतिरिक्त अन्य जमिनींवर शासनाच्या परवानगीशिवाय कोणतेही बांधकाम करता येणार नसून ही प्रक्रिया मोठी खर्चिक असल्याने नागरिकांत त्याविरोधात चांगलाच रोष दिसून येतोय. परिणामी या गावात यापुढे औद्योगिक, वाणिज्य, रहिवाशी विकास होणे शक्य नसून ग्रामपंचायतीचे उत्पन्न बुडणार आहे. तसेच लघुउद्योगांना खीळ बसून सुशिक्षित बेरोजगारांना नवीन व्यवसाय सुरु करणे त्याचबरोबर बांधकाम मजूर, कारागीर, औद्योगिक कामगार, बिल्डिंग मटेरियल सप्लायर यांना रोजगार उपलब्ध होणार नसल्याचे वाडावासियांचे म्हणणे आहे. शासन अशा प्रकारे तालुक्यातील गावांचा विकासाचा अधिकारच काढून घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

या बैठकीत पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे, प्रादेशिक विकास आराखडा विरोधी कृती समितीचे सदस्य आणि वास्तुविशारद महेंद्र काळे, पंचायत समिती सदस्य माणिक म्हसरा, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख अरुण पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रोहिदास पाटील, पत्रकार युवराज ठाकरे, निखिल भानुशाली आदींसह सरपंच, ग्रामसेवक व नागरिक उपस्थित होते.

शासनाने प्रसिद्ध केलेला कृती आराखडा स्थानिक नागरिकांवर, शेतकर्‍यांवर अन्यायकारक असून येथील जनतेच्या मुळावर येणारा आहे. असा विकास येथील नागरिकांना व शेतकर्‍यांना मान्य नसून शासनाने गांभीर्याने विचार करून स्थानिक नागरिकांच्या व शेतकर्‍यांच्या हिताचे धोरण प्रसिद्ध करावे.
-निलेश गंधे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, पालघर

शासनाने प्रसिद्ध केलेले विकास केंद्रांचे प्रस्ताव व नकाशे ही या भागातील नागरिकांची फार मोठी फसवणूक असून येथील लोकांवर अन्याय झाला आहे. तरी हे विकासकेंद्रांचे नकाशे तात्काळ रद्द करून नव्याने समाजाला उपयोगी पडतील असे नकाशे तयार करावे, अशी आमची मागणी आहे.
-महेंद्र काळे, वास्तुविशारद, प्रादेशिक विकास आराखडा विरोधी कृती समिती, पालघर.

comments

About Rajtantra

Scroll To Top