दिनांक 20 February 2020 वेळ 10:04 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाड्यात तस्करांकडून खैर वृक्षांची कत्तल!

वाड्यात तस्करांकडून खैर वृक्षांची कत्तल!

वन विकास महामंडळाचे दुर्लक्ष; गुन्हे दाखल करण्यात वन अधिकार्‍यांची दिरंगाई

दिनेश यादव//वाडा, दि. 27 : एकीकडे सरकार कोट्यावधी वृक्षलागवडीचे धोरण अवलंबून वनसंवर्धनाचा प्रयत्न करत असताना हे धोरण राबविण्याची ज्या वन विकास महामंडळावर विशेष जबाबदारी आहे त्या महामंडळा अंतर्गत वाड्यातील संरक्षित वनक्षेत्रात तस्करांनी मोठ्याप्रमाणावर खैर वृक्षांची कत्तल करून लाखो रुपये किंमतीचा माल लंपास केला आहे. दरम्यान, या वृक्षतोडी संदर्भात महामंडळाच्या येथील प्रकल्प वनक्षेत्रपाल अधिकार्‍यांनी गुन्हे नोंदविण्यात दिरंगाई केल्याने त्यांच्या हेतू बाबत संशय निर्माण होतोय.

वाडा तालुक्यातील वाडा – मनोर महामार्गावरील वाघोटे टोलनाक्यापासून अवघ्या अडीचशे मीटरवर वनविकास महामंडळाचे संरक्षित वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रातील मोठमोठ्या खैर प्रजातीच्या दहा ते पंधरा वृक्षांची कत्तल करून ही लाकडे तस्करांनी चोरून नेला आहे. या घटनेनंतर तातडीने वनक्षेत्रपाल अधिकार्‍यांनी आरोपींवर गुन्हे दाखल करणे अपेक्षित होते. तसेच एकाचवेळी एवढी मोठी वृक्षतोड झाली असताना वनक्षेत्रपाल अधिकार्‍यांनी ठराविक दिवसांच्या अंतराने दोन – दोन वृक्षांची तोड झाल्याचे दाखवून गुन्हे नोंदवल्याने वन क्षेत्रपाल अधिकारी व कर्मचार्‍यांचेच यात हितसंबध गुंतलेत की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. दोन वृक्षांची चोरटी तोड झाल्याचा पहिला गुन्हा 20 जूनला नोंदविण्यात आला. तर 25 जूनला पुन्हा दोन वृक्षांची तोड झाल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एकाचवेळी मोठ्याप्रमाणावर तोड झाली असताना वेगवेगळ्या दिवशी अवघ्या चार वृक्षांची चोरटी तोड झाल्याचे दाखविण्यामागे नेमके कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खैर प्रजातीच्या वृक्षाला बाजारात मोठी किंमत आहे. गुटखा उत्पादनासाठी त्याचा वापर मोठ्याप्रमाणात होत असल्याने बाजारात सोन्याच्या भावाने खैर विकला जातोय. वाडा तालुका खैर प्रजातीच्या वृक्षांसाठी ओळखला जात असल्याने खैर तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. वनविभागाच्या अधिकार्‍यांचेही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होऊ लागल्याने अधिकार्‍यांच्या अनास्थेपायी आगामी काळात जंगलच नष्ट होईल की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे. वन विकास महामंडळाकडे जंगलाच्या रक्षणासाठी गस्त घालण्याकरीता स्वतंत्र वाहन व्यवस्था आहे. असे असताना महामार्गापासून अवघ्या अडीचशे मीटर अंतरावर एवढी मोठी वृक्षतोड होतेच कशी? असा सवाल नागरिक करत आहेत.

तालुक्यात चोरटी वृक्षतोड मोठ्याप्रमाणावर सुरु असून याकडे वनविभाग दुर्लक्ष करत आहे. प्लॉटधारक आदिवासींना नाहक खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून खर्‍या गुन्हेगारांना मोकाट सोडत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच महामार्गालगत राजरोसपणे वृक्षांची कत्तल होत असून ह्याला वनविभागाचे अधिकारीच जबाबदार आहेत.

तालुक्यात चोरटी वृक्षतोड मोठ्याप्रमाणावर सुरु असून याकडे वनविभाग दुर्लक्ष करत आहे. प्लॉटधारक आदिवासींना नाहक खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून खर्‍या गुन्हेगारांना मोकाट सोडत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच महामार्गालगत राजरोसपणे वृक्षांची कत्तल होत असून ह्याला वनविभागाचे अधिकारीच जबाबदार आहेत.
-अनंता वनगा, सामाजिक कार्यकर्ते

चोरटी वृक्षतोड झाली आहे व यासंदर्भात गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असून आरोपींचा तपास सुरू आहे.
-डी. एन. निकम,
प्रकल्प वनक्षेत्रपाल, वन विकास महामंडळ, वाडा (गांध्रे)

comments

About Rajtantra

Scroll To Top