दिनांक 20 February 2020 वेळ 10:22 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसेवा ढासळली!

वाडा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसेवा ढासळली!

प्रतिनिधी/वाडा, दि. 16 : वाडा व विक्रमगड तालुक्यातील लाखो रुग्णांना आरोग्य सुविधा देणार्‍या वाडा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे होणारे हाल काही केल्या थांबायला तयार नाहीत. वाडा व विक्रमगड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या म्हसरोली गावातील एका अतिशय गंभीर रुग्णाला मिळालेल्या असुविधेमुळे रुग्णालयातील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून याकडे वरिष्ठांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

म्हसरोली गावातील एक व्यक्ती आपल्या शेतात पॉवर टिलरद्वारे नांगरणी करीत असताना झालेल्या अपघातात त्याच्या पायाला गंभीर इजा झाली. यानंतर त्याला उपचारासाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र येथे अत्यावश्यक सुविधा न मिळाल्याने त्याला त्याच अवस्थेत पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलवावे लागले, अशी माहिती रुग्णासोबत असलेल्या एका सामाजिक कार्य करणार्‍या व वैद्यकीय सेवेतील शिक्षण घेणार्‍या विदेश पाटील या तरुणाने व्हिडीओ प्रसिद्ध करून दिली आहे.

ग्रामीण रुग्णालयाच्या अंतररुग्ण विभागाच्या दुरुस्तीचे काम सुरु असून मागील तीन ते चार महिन्यांपासुन हे काम सुरु असल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. वाडा ग्रामीण रुग्णालय तीस खाटांचे रुग्णालय असून सध्या पुरुष विभागातील खाटा स्त्री रुग्ण विभागात आडव्या तिडव्या लावून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे स्त्री रुग्ण व पुरुष रुग्ण एकत्र उपचार घेत असल्याने त्यांची व विशेषत: स्त्रीयांची मोठी कुचंबणा होत आहे. सध्य स्थितीत दोन्ही विभागाचे काम पूर्ण झाले असले तरी पुरुष रुग्ण विभाग अजूनही रिकामाच आहे. तर स्त्री रुग्ण विभागात रुग्ण व नातेवाईकांची गर्दी झालेली दिसून येत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे जखमी रुग्णांना मोबाईल टॉर्चच्या उजेडात टाके लावले जात असल्याचा प्रकारही होत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात डॉ. प्रदीप जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

comments

About Rajtantra

Scroll To Top