दिनांक 21 January 2020 वेळ 5:20 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » विद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट

विद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 14 : मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा मुख्यालयापासून जवळ व सोयीच्या ठिकाणी व्हावे यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर सातत्याने प्रयत्नशील आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून काल, गुरुवारी (दि. 13) उपकेंद्राची जागा निश्चित होण्याच्या दृष्टीकोनातून डॉ. पेडणेकर यांनी पालघर जिल्ह्याचा दुसरा दौरा केला.

या दौर्‍यात त्यांनी प्रथम जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची भेट घेऊन जागेसंबंधी आणि उपकेंद्राच्या उभारणी संबंधीच्या तांत्रिक बाबींची सविस्तर चर्चा केली. त्यानंतर दोन ठिकाणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. विद्यापीठाच्या उपकेंद्राची प्रशासकीय इमारत लवकरात लवकर सुरु करण्याची निकड लक्षात घेवून त्यासाठी आवश्यक असलेली जागा ताब्यात देण्याची प्रक्रीया जलद गतीने पुर्ण केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिले. या दौर्‍यात कुलगुरुंसोबत विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील, माजी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे, सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे सचिव प्रा. अशोक ठाकूर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे उपस्थित होते. विद्यापीठ उपकेंद्र मार्गी लागण्यासाठी समन्वयक म्हणून डॉ. दिनेश कांबळे आणि स्थानीय समन्वयक प्राचार्य डॉ. किरण सावे यांची कुलगुरूंनी नियुक्ती केली आहे. ते यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे आणि तहसीलदार सौ. उज्ज्वला भगत यांच्याशी सातत्याने संपर्कात आहेत.

जिल्हाधिकार्‍यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मुंबई विद्यापीठाच्या सिंधु स्वाध्याय या उपक्रमांतर्गत सातपाटी येथे मत्सव्यवसायाशी संबंधित अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी संबंधित शिष्टमंडळाने सातपाटी येथील सर्वोदय सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाशी चर्चा केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पंकज नरेंद्र पाटील, संचालक सुरेश म्हात्रे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. यावेळी संस्थेने विद्यापीठाचे अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यानंतर कुलगुरु डॉ. पेडणेकर यांनी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाला भेट देवून महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष हितेंद्र शाह, सचिव अतुल दांडेकर, प्राचार्य डॉ. किरण सावे, पर्यवेक्षक प्रा. महेश देशमुख उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाच्या उपकेंद्रासह विद्यापीठाचे अनेक महत्वपूर्ण उपक्रम मार्गी लावण्यासाठी सोनोपंत दांडेकर महाविद्यालय देत असलेल्या सहकार्याचा कुलगुरुंनी आवर्जून उल्लेख केला.

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या भेटीनंतर उपविभागीय महसुल अधिकारी विकास गजरे यांच्याशी कुलगुरु यांनी उपकेंद्राच्या जागेसंबंधी चर्चा केली. तसेच पालघरचे खासदार राजेंद्र गावीत यांची भेट घेऊन पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी उपकेंद्र अत्यंत आवश्यक आहे, त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कुलगुरुंनी केले. तर या महत्वपूर्ण उपक्रमास पुर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन राजेंद्र गावीत यांनी दिले.

comments

About Rajtantra

Scroll To Top