दिनांक 26 May 2020 वेळ 5:22 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » सफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत

सफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत

वार्ताहर/बोईसर, दि. 13 : सफाळ्याला केळवे, पालघर व माहिमशी जोडणार्‍या राज्य महामार्गावरील माकुणसार खाडीवरील पूल अतिशय धोकादायक स्थितीत असल्याचे समोर आले आहे. आज डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेसह केळवे ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी या पुलाची पाहणी केली असता पुलाचे ऑडिट व्हावे व लवकरात लवकर त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

माकुणसार खाडीवरील पूल बांधून अनेक वर्षे झाली आहेत. केळवे हे पर्यटन क्षेत्र असल्याने येथे मुंबईसह विविध भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. तसेच अनेक वाहनचालक केळवे मार्गे सफाळा व पुढे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गाठतात. त्यामुळे या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी पाहायला मिळते. गेल्या वर्षी या पुलाची पाहणी करून सप्टेंबर महिन्यात या पुलाला असणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करुन पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली होती. या विनंतीनुसार पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचेही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते. परंतु संस्थेने आज केलेल्या पाहणीत पुलाची केलेली दुरुस्ती म्हणजे केवळ दिखाऊपणा असल्याचे समोर आले आहे. सफाळे विभागाला केळवे, माहिम, पालघर या गावांना जोडणारा राज्य महामार्गावरील हा महत्वाचा पुल असूनही पुलाबाबत होणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता लक्षात घेता या धोकादायक पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी तसेच दरम्यानच्या काळात वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात यावा, अशी मागणी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था व ग्रामस्थांनी केली आहे.

सफाळा माकुणसार पुलाचे बांधकाम उखडून लोखंडी सांगाडा दिसू लागला आहे. पूल कोसळण्याचे प्रकार घडत असताना बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रत्येक पुलाची माहिती घेऊन दुरुतीचे प्रस्ताव स्वतः करावेत. ग्रामस्थांच्या सुचनांची वाट पाहू नये.
भावना केणी, सरपंच, केळव ग्रामपंचायत

comments

About Rajtantra

Scroll To Top