दिनांक 26 May 2020 वेळ 5:55 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या!

वाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या!

पालघर-मनोर रस्त्यावरील वाघोबा खिंडीत शासकीय वाहनाला ट्रकची धडक

प्रतिनिधी/वाडा, दि. 13 : वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके या बुधवारी (दि.12) पालघर येथील सर्वसाधारण सभा आटोपून सायंकाळच्या सुमारास वाड्याच्या दिशेने येत असताना वाघोबा खिंडीत एका ट्रकने त्यांच्या जीपला जोराची धडक दिली. या अपघातात त्या थोडक्यात बचावल्या आहेत.

पालघर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. 12) पालघर येथे असल्याने वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके या शासकीय वाहनातून प्रवास करुन सभेसाठी उपस्थित होत्या. सभा आटोपल्यानंतर त्या वाड्याकडे येत असताना वाघोबा खिंडीत एका ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटवे व टृक सभापती शेळके यांच्या वाहनावर आदळल्याने अपघात झाला. सुदैवाने या अपघातात चालक व शेळके यांना साधी दुखापतही झाली नाही.

दरम्यान, वाडा पंचायत समितीसाठी चार वाहने कार्यरत असून एक गटविकास अधिकार्‍यासाठी, दुसरे पाणी पुरवठा विभागासाठी, तिसरे महिला बाल कल्याण विभागासाठी तर चौथे वाहन सभापतींच्या सेवेत आहे. मात्र या चार वाहनांसाठी तीनच वाहन चालक कार्यरत असल्याने बुधवारच्या सर्वसाधारण सभेसाठी सभापतीच्या वाहनांकरता वाहन चालक उपलब्ध नसल्याने गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे यांनी पंचायत समितीतील शिपाई पदावर कार्यरत असलेले संतोष भोईर यांना वाहनचालक म्हणून जाण्याचे आदेश दिले. त्यामुळे सभापती शेळके यांनी अपघातानंतर गटविकास अधिकार्‍यांनी अधिकृत वाहनचालक न दिल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या जानेवारी महिन्यापासून माझ्या गाडीसाठी अधिकृत वाहनचालक नसल्याने याबाबत मी वारंवार गटविकास अधिकारी यांच्याकडे चालकाची मागणी करीत आहे. मात्र जिल्हा परिषदेकडे चालक पदासाठी प्रस्ताव पाठवल्याचे कारण पुढे करून चालढकल केली जात आहे. हा पंचायत समिती प्रशासनाचा ढिसाळपणा असून कालच्या अपघातात सुदैवाने मी व वाहन चालक बचावलो आहोत.
अश्विनी शेळके, सभापती पंचायत समिती, वाडा.

वाडा पंचायत समितीत चार वाहने असून त्यासाठी तीनच वाहन चालक कार्यरत आहेत. उर्वरित एक वाहन चालक पदासाठी वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र मागील महिन्यात आचारसंहिता लागल्याने ही प्रक्रिया खोळंबली आहे. ती आता लवकरच पूर्ण केली जाईल. परंतु आजपासून महिला व बालकल्याण विभागाच्या वाहनचालकाची नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपात केली आहे.
राजलक्ष्मी येरपुडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, वाडा.

comments

About Rajtantra

Scroll To Top