दिनांक 16 June 2019 वेळ 4:02 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा

वाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा

  • हळव्या भात बियाणांचे काही प्रमाणात वाटप
  • गरव्या बियाणांची मागणीच नाही
  • कृषी विभाग अजूनही निद्रिस्त

प्रतिनिधी/वाडा, दि. 13 : वाडा तालुका शेतीप्रधान तालुका असून येथे भातशेतीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यात हळव्या भातशेतीचे प्रमाण 25 टक्के तर निमगरवे व गरव्या भातशेतीचे प्रमाण 75 टक्के असताना पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून केवळ हळवे भात बियाणे काही प्रमाणात मागविण्यात आले आहे. तर गरव्या भात बियाणांचा तालुका कृषी कार्यालय व पंचायत समिती कृषी विभाग या दोन्ही कार्यालयाकडे पत्ताच नसल्याने शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. तालुक्यात 14 हजार हेक्टर क्षेत्रात भात शेती केली जाते. यामध्ये हळवे, निमगरवे व गरवे असे प्रकार असून हळवे भातशेतीचे प्रमाण 25 टक्के असून 75 टक्के निमगरवे व गरवे भात शेती केली जाते. असे असताना पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून केवळ हळवे भातशेतीचे 250 क्विंटल भात बियाणे मागविण्यात आले आहे. त्यापैकी जिल्हा परिषदेकडून 100 क्विंटल कर्जत 3 हे भात बियाणे, तर 75 क्विंटल निमगरवे कर्जत-5, 7 व 9 असे एकुण 175 क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले आहे. बियाणे वाटपात कर्जत 3 हे हळवे बियाणे हातोहात संपले. विशेष म्हणजे तालुक्यात 75 टक्के शेती ही गरवी असताना तालुका कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभागाने गरवे भात बियाणांचा एक दाणा मागितलेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कृषी विभागाचे शेतीकडे दुर्लक्ष असल्याचे यावरून दिसून येत आहे.

याबाबत तालुका कृषी अधिकारी माधव हासे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

शासनाकडून केवळ हळव्या भात बियाणांचा पुरवठा करण्यात येत असल्याने आलेले बियाणे शेतकर्‍यांना वाटप करण्यात आले आहे.
बी. बी. शिंदे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, वाडा.

comments

About Rajtantra

Scroll To Top