दिनांक 26 May 2020 वेळ 5:08 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार! -खा. राजेंद्र गावित

पेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार! -खा. राजेंद्र गावित

वार्ताहर/बोईसर, दि. 13 : ईपीएस-95 पेन्शनधारकांच्या समस्यांची मला जाणिव असून पेन्शनवाढीसाठी कोशियारी समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे या प्रमुख मागण्यांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन, येत्या हिवाळी अधिवेशनात याप्रश्‍नी संसदेत आवाज उठवून पेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार, असे आश्वासन पालघर मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांनी पेन्शनधारकांच्या पालघर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय मेळाव्यात दिले.

पेन्शनधारकांच्या पालघर जिल्हा समन्वय समितीच्या वतीने जिल्हास्तरीय मेळावा आणि खासदार गावित यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समितीचे पालघर जिल्हाध्यक्ष अनिल ताहाराबादकर यांनी पेन्शनधारकांच्या व्यथा मांडल्या. वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करुनही मागील कालावधीत सरकारने या दुर्बल घटकाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे देशातील ज्येष्ठांकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा, असेही त्यांनी सांगितले.

काँगे्रसचे सरकार सत्तेवर असताना प्रकाश जावडेकर यांनी ईपीएस-95 पेन्शनधारकांच्या पेन्शनचा मुद्दा ताणून धरल्याने तत्कालीन सरकारने भगतसिंग कोशियारी समितीची स्थापना केली. जावडेकरही या समितीचे सदस्य होते. या समितीने किमान तीन हजार पेन्शन व त्याला महागाई भत्ता जोडावा, अशी शिफारस आपल्या अहवालात केली आहे. मात्र गेल्या पाच वर्षात आपणच मागितलेल्या शिफारशींची अंमलबजावणी न केल्याने देशभरातील पेन्शनरांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील पेन्शन धारकांच्या आजच्या मेळाव्या निमित्त खासदार राजेंद्र गावित यांचा सत्कार करून त्यांना पेन्शन धारकांच्या समस्यांचा पाढा वाचून दाखविण्यात आला.

यावेळी विठ्ठल रखुमाई ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत दांडेकर, अशोक राऊत, प्रदीप पाटील, रविंद्र चाफेकर, हेमंत पाटील, रविंद्र कदम, विजय राऊत, सुभाष मोरे, अनंत कुडू, विलास ठाकूर आदींनी पेन्शनधारकांच्या समस्यांना वाचा फोडली.

comments

About Rajtantra

Scroll To Top