दिनांक 25 May 2020 वेळ 12:22 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » बोर्डीरोड रेल्वे स्थानकात अनर्थ टळला; वादळी वाऱ्याने निर्माणाधीन पूलाचे गर्डर आडवे झाले

बोर्डीरोड रेल्वे स्थानकात अनर्थ टळला; वादळी वाऱ्याने निर्माणाधीन पूलाचे गर्डर आडवे झाले

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. १२ : डहाणू तालुक्यातील महाराष्ट्रातील शेवटचे स्थानक असलेल्या बोर्डीरोड रेल्वे स्थानकानजिक बांधल्या जाणाऱ्या रेल्वे फ्लाय ओव्हर ब्रिजला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. वाऱ्याने या निर्माणाधीन पुलावर ठेवलेले गर्डर (लोखंडी खांब) एकमेकांवर आडवे पडले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे येथे काम करीत असलेल्या काही कामगारांनी खाली उड्या मारल्या. या धांदलीमध्ये ४ कामगार जखमी झाल्याचे वृत्त आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे.

आज हे गर्डर पिलर्सवर चढविण्यासाठी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंतचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या मुदतीत गर्डर वर चढवण्याचे काम पूर्ण झाले होते. मात्र परस्परांशी जोडले गेले नव्हते. इतक्यात सोसाट्याचा वारा आला आणि उभे असलेले गर्डर आडवे पडले. त्याच वेळी खालून मालगाडी सोडण्यात आली होती. सुदैवाने गर्डर खाली न पडल्याने मोठी हानी टळली असली तरी हे गर्डर हलविण्यासाठी रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली.

रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल

दरम्यान, या घटनेमुळे पश्चिम रेल्वेची लांब पल्ल्याची सेवा पूर्णपणे ठप्प झाली. शेवटचे वृत्त मिळेपर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या डहाणू ते पालघर दरम्यान थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. रेल्वे सेवा पुन्हा सुरू होण्याविषयी निश्चित माहिती मिळत नसल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाल्याचे स्टेशन परिसरात पहावयास मिळत होते. प्रवाशांच्या सोयीसाठी डहाणू स्टेशन ते उंबरगावपर्यंत एस. टी. सेवा सुरू करण्यात आली होती. तसेच अनपेक्षित उद्भवलेल्या या परिस्थितीत प्रवासी खाजगी वाहनांचा आसरा घेताना दिसले. तर स्टेशनवरील स्टॉलवर मिळेल ते खाद्यपदार्थ खाऊन प्रवासी आपली भूक भागवताना दिसत होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top