दिनांक 25 May 2020 वेळ 1:36 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » मुख्यमंत्री फेलोशिपसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस

मुख्यमंत्री फेलोशिपसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस

राजतंत्र न्युज नेटवर्क/मुंबई, दि. 12 : प्रशासनामध्ये युवकांना सहभागी करुन घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री फेलोशिप हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यंदाच्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम – 2019 मध्ये सहभागाची अंतिम मुदत 14 जून 2019 पर्यंत असून इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमातून निवड झालेल्या युवकांचा उत्साह, नाविन्यपूर्ण दृष्टीकोन व तंत्रज्ञानातील त्यांची गती यांचा प्रशासनास उपयोग व्हावा आणि सोबतच युवकांनाही शासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा, हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दीष्ट आहे. तरुणांमध्ये नेतृत्वगुण विकसित होतील, सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणार्‍यांना तसा अनुभव मिळेल, अशा रितीने हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. या 11 महिन्यात शासनासोबत काम करण्याची संधी देणं, तंत्रज्ञान-पायाभूत सुविधा-सामाजिक विकास क्षेत्रातील विविध उपक्रम व प्रकल्पांची अंमलबजावणी तसेच धोरण निर्मिती यामध्ये त्यांना सहभागी करून घेणं, हा उद्देश यातून साध्य करण्यात येतो.

उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी शासनासोबत या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी युवकांना केले आहे. 21 ते 26 वयोगटातील, प्रथम वर्ग पदवीधर व पूर्णवेळ कामाचा एक वर्षाचा अनुभव असलेला भारताचा नागरिक या फेलोशिपसाठी अर्ज करू शकेल. फेलोशिपचा कालावधी 11 महिन्यांचा असून फेलोला मानधन व प्रवासखर्चासाठी दरमहा 45 हजार रुपये दिले जातात. फेलोशिपसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असून, त्यासंदर्भात अधिक माहिती मिळण्यासाठी व अर्ज करण्यासाठी
http://mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, अशी माहिती शासनातर्फे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top