अपंगत्वावर मात करत पटकावले 89 टक्के गुण!

0
4

बोईसरचा आदित्य ठरला शाळेत अव्वल

वार्ताहर/बोईसर, दि. 12 : गेल्या तीन-चार वर्षांपासून कमरेखालील स्नायूवर शरीराचे नियंत्रण नसलेल्या बोईसर येथील आदित्य विकास संदानशिव या विद्यार्थ्याने बोईसर एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. स. दा. वर्तक शाळेत शाळांत परीक्षेत (एसएससी) अव्वल क्रमांक पटकावला आहे. आपल्या अपंगत्वावर मात करून जिद्दीच्या बळावर पुढे उच्चशिक्षित होऊन शासकीय सेवेत नोकरी करण्याच्या निर्धार या विद्यार्थ्याने व्यक्त केला आहे.

मूळच्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर परिसरात जन्मलेल्या आदित्यचे प्राथमिक शिक्षण सांगलीतील विठ्ठलवाडी येथे झाले आहे. त्याचे वडील विकास संदानशिव हे बोईसरमधील सेवा आश्रम विद्यालयात इंग्रजीचे शिक्षक असून आदित्यला लहानपणापासून पायाच्या टाचा टेकण्याबाबत समस्या होती. सातवी इयत्तेत आल्यानंतर त्याच्या कमरेखालील स्नायूंवरील शरीराचे नियंत्रण कमी होत गेले. त्याच्यावर सांगली, पुणे, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी औषधोपचार करण्यात आले. मात्र आदित्यला जडलेल्या या दुर्मिळ आजारावर औषधे उपलब्ध नसल्याने मुंबईजवळ आल्यास उपचाराची नवीन संधी प्राप्त होईल या आशेवर त्याच्या वडिलांनी बोईसर येथील शाळेत आपली बदली करून घेतली.

आदित्य बोईसर एज्युकेशन संस्थेच्या डॉ. स. दा. वर्तक शाळेत इयत्ता आठवीपासून शिकत होता. आपल्या सहकार्यांप्रमाणे धावता, बागडता व खेळता येत नाही याची खंत असताना तो आपल्या मनाची समजूत काढत असे. गेल्या वर्षभरात त्याने सातत्याने अभ्यास करत नुकत्याच निकाल लागलेल्या शालांत परीक्षेत 89 टक्के गुण प्राप्त केले असून त्याच्या शाळेत तो प्रथम आला आहे. शालांत परिक्षेच्या दृष्टीने शाळेतील शिक्षकांनी आदित्यकडे विशेष लक्ष दिले तसेच शिकवणीकरीता बाहेर जाणे शक्य नसल्याने आदित्यच्या वडिलांच्या मित्रांनी त्याला घरीच येऊन मार्गदर्शन केले. तर आदित्यनेही आपल्या चिकाटीने तसेच आजारावर मात करण्याची जिद्द बाळगून सातत्यपूर्ण अभ्यास करत चांगल्या गुणांनी शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सुस्वभावी व चांगले हस्ताक्षर असलेल्या आदित्यला त्याच्या मित्र परिवाराने व पालकांनी सतत पाठबळ दिल्याने आपल्याला चांगले गुण मिळवणे शक्य झाल्याचे त्याने सांगितले. उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी किंवा शासकीय सेवेत उच्चपदी नोकरी करण्याची व स्नायूच्या दुर्धर आजारावर मात करून समाजासाठी योगदान देण्याची त्याची इच्छा आहे. टीव्हीवर क्रिकेट सामने पाहण्यासोबत आदित्यला कॅरम खेळाची आवड असून तिसरी ते सहावी दरम्यान त्याने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये केंद्रस्तरीय यश प्राप्त केले आहे.

संबंधित बातमी : 96.80% गुणांसह दिशांक केशव नायक ठरला डहाणू तालुक्यातील टॉपर

आदित्यचा शाळेचा प्रवास…
आदित्यला स्वत:च्या पायावर उभे राहणे देखील शक्य नसल्याने त्याच्या वडिलांनी शाळेसमोरच घर घेतले. त्याचे वडील आदित्यची तयारी करून त्याला दुचाकीवर बसून शाळेमध्ये पोहोचवत असत. वजनाने हलका असल्याने त्याला उचलून त्याच्या वर्गापर्यंत नेण्यास त्याच्या वडिलांसोबत शाळेचे शिपाई वेळप्रसंगी मित्रदेखील मदतीचा हात देत. आदित्य स्वतःचा अभ्यास स्वतः करतो तसेच घरातील स्वतःची नित्यक्रम तो स्वतः करून स्वावलंबी राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले.

बोईसर एज्युकेशनचे अपंगांसाठी मदतीचा हात
बोईसरमधील डॉ. स. दा. वर्तक विद्यालय ही एक विद्यार्थीकेंद्रीत शाळा म्हणून नावाजलेली असून शाळेत अगदी सुरूवातीपासूनच अपंग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते. शाळेतून कर्णबधिर, अस्थिव्यंग, तसेच अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केले असून हे बरेचसे विद्यार्थी उच्चशिक्षित झाले आहेत. या विद्यार्थ्यांकडे शाळेतील शिक्षकांकडून विशेष लक्ष दिले जाते.

माझी मुलगी अमृता ही कर्णबधिर असतानाही डॉ. स. दा. वर्तक विद्यालयाने शाळेत प्रवेश देऊन घेतलेल्या मेहनतीमुळे ती 85 टक्के गुणांनी दहावी उत्तीर्ण झाली होती. त्यानंतर तिने डी. फार्म व डिप्लोमा इन डेंटल मेकॅनिक्स हा अभ्यासक्रम प्रतिथयश कॉलेजमधून यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. याचे श्रेय निश्चितच डॉ. स. दा. वर्तक विद्यालयाला जाते.

-चंद्रकांत कोठावदे, पॅथॉलॉजिस्ट, बोईसर

Print Friendly, PDF & Email

comments