उप जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरला मारहाण

0
588

घटनेच्या निषेधार्थ बाह्यरुग्ण विभाग बंद

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 11 : उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी डहाणू उप जिल्हा रुग्णालयाचे डॉ. डिसोझा (सर्जन) यांना मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी डहाणू पोलीस स्टेशनमध्ये 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये मृताचा मुलगा व अन्य एका अल्पवयीन नातेवाईकाचा समावेश आहे. डॉक्टरला मारहाण झाल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्‍यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून त्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. आज सलग दुसर्‍या दिवशी रुग्णालयाचा बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवण्यात आला असून यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 10 जून रोजी सकाळी 7 च्या सुमारास वाणगांव येथून सुबहान खान या 60 वर्षीय इसमास बेशुद्धावस्थेत डहाणू उप जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णाच्या तोंडातून फेस आला असल्याने त्याला डॉ. हर्शिला गाला यांनी विषबाधेची लक्षणे गृहीत धरुन उपचार सुरु केले. दरम्यान सकाळच्या पाळीचे डॉ. डिसोझा 8.30 वाजता रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी रुग्णाला तपासून अतिदक्षता विभागात उपचाराची आवश्यकता असल्याने व येथे उपचार शक्य नसल्याने पुढील उपचारांसाठी इतरत्र हलविण्याबाबत नातेवाईकांना सांगितले. त्यासाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध करण्यात आली. मात्र रुग्णाची प्रकृती आणखी ढासळल्याने त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास व आवश्यक ते उपचार सुरु करुन स्थिर करण्याचे प्रयत्न सुरु झाले. या प्रयत्नांना यश न लाभल्यामुळे सकाळी 10.30 वाजता रुग्णाला मृत घोषित करण्यात आले. मात्र या मृत्यूला येथील डॉक्टरच जबाबदार असल्याच्या भावनेतून मृत रुग्णाचा मुलगा आसिफ व अन्य एका नातेवाईकाने मिळून डॉ. डिसोझा यांना ठोश्याबुक्क्याने मारहाण केली. यात डॉ. डिसोझा यांच्या नाकाचे हाड तुटले आहे.

याप्रकरणी डहाणू पोलीस स्टेशनमध्ये सुभानसह एका अल्पवयीन मुलावर भारतीय दंड विधान संहितेचे कलम 353, 335, 323, 34 सह महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व वैद्यकीय संस्था अधिनियम 2010 चे कलम 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन आरोपीस ताब्यात देखील घेण्यात आले आहे. याबाबत रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर भोये यांची भेट घेतली असता डॉ. डॉ. डिसोझांना झालेल्या मारहाणीमुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून रुग्णालयात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात यावा, अशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. बाह्यरुग्ण विभाग बंद असला तरी आंतररुग्ण विभागात तसेच तातडीच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पोलीसांनी उद्यापर्यंत बंदोबस्त तैनात करण्याची व्यवस्था करावी अन्यथा 13 जूनपासून संपूर्ण रुग्णालय ठप्प केले जाईल, असा इशारा याप्रकरणी डॉ. सूर्यकांत लोंढे यांनी दिला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments