दिनांक 25 May 2020 वेळ 2:22 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वन कायद्याविरोधात श्रमजीवींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मार्चा!

वन कायद्याविरोधात श्रमजीवींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मार्चा!

रानभाज्या व रानमेव्याच्या पालखी व टोपल्या घेऊन मोर्चात सहभागी झाले कार्यकर्ते!

वार्ताहर/बोईसर, दि. 10 : केंद्र सरकारच्या प्रस्तावित भारतीय वन कायदा सुधारणा-2019 या विधेयकाच्या मसुद्यातील तरतुदी आदिवासी कष्टकरी वन हक्क दावेदारांना उद्ध्वस्त करणार्‍या आहेत, असे सांगत आज श्रमजीवी संघटनेने हजारोंच्या संख्येने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जंगल आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे या घोषणेने परिसर दणाणून सोडला. या विधेयकाच्या अन्यायकारक तरतुदींना विरोध करण्यासाठी पारंपरिक वेशभूषेमध्ये रानभाज्या व रानमेव्याच्या पालखी व टोपल्या घेऊन श्रमजीवीचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी मोर्चात आणलेली आदिवासींच्या पारंपरिक हिरव्या देवाची पालखी लक्षवेधी ठरली.

केंद्र सरकारने जागतिक तपमान वाढीच्या नावाखाली जंगलातील आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी जनतेच्या हक्कांवर गदा आपणारा सुधारित वन कायदा तयार करण्याचे ठरविले असून त्यासाठी भारतीय वन कायदा सुधारणा – 2019 हे विधेयक आणलेे आहे. हा जुलमी वन कायदा म्हणजे अदिवासी व पारंपरिक वननिवासी यांच्या परंपरागत वन हक्कांवर आणलेली गदा आहे व आपल्या उपजिविकेसाठी जंगलावर निर्भर असलेल्या आदिवासींच्या हातातून जंगलाचे अधिकार काढून घेऊन वनक्षेत्र वाढविण्याच्या नावाखाली बड्या भांडवलदरांना कॅशक्रॉपची वनशेती करता यावी यासाठी रान मोकळे करण्यासाठीचे धोरण सरकार अवलंबून पाहते आहे. आदिवासी पारंपारिक वननिवासींच्या हिताच्या विरोधी भुमिका घेऊन व्यापारी वनशेतीला उत्तेजन देणार्‍या, वनअधिकार्‍यांना अमर्याद अधिकार देऊन आदिवासींचे वन हक्क डावलू पाहणार्‍या, ग्रामसभेचे अधिकार कमी करून ग्रामवनांची समांतर पध्दत आणू पाहणार्‍या सरकारच्या भुमिकेला संघटनेचा प्रखर विरोध असल्याचे श्रमजीवीने म्हटले आहे.

आदिवासी आणि अन्य पारंपरिक वननिवासी बांधवांना उद्ध्वस्त करणार्‍या तरतुदी या मसुद्यातून वगळाव्या, वन अधिकार्‍यांना दिलेले जुलमी अमर्याद अधिकार काढून घ्यावेत. तसेच वनांचे खाजगीकरण करण्याचे धोरण बदलावे आदी मागण्या करत हे अन्यायकारक विधेयक मागे घेण्याची मागणी श्रमजीवीने केली आहे.

पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, कार्याध्यक्ष केशव भाऊ नानकर, उप कार्याध्यक्षा स्नेहा दुबे पंडित, केशव नानकर, सरचिटणीस बाळाराम भोईर व विजय जाधव, पालघर जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे, उपाध्यक्ष लक्ष्मण पडवले, रवी चौधरी, रामचंद्र रोज, जिल्हा सचिव गणेश उंबरसाडा, उल्हास भानुशाली, रुपेश डोले आदींसह सर्व जिल्हा तालुका पदाधिकारी, घटक प्रमुख व मोठ्या संख्येने आदिवासी महिला, पुरुष व युवक सहभागी झाले होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top