दिनांक 21 September 2019 वेळ 6:33 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ओझर कुंडाचापाड्यात पोचली बससेवा

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ओझर कुंडाचापाड्यात पोचली बससेवा

प्रतिनिधी/जव्हार, दि. 10 : तालुक्यापासून 36 कि.मी. अंतरावर असलेल्या ओझर कुंडाचापाड्यात स्वातंत्र्यनंतर पहिल्यांदा बस पोहचली आहे. बससेवा सुरु झाल्याने येथील ग्रामस्थ आणि खासकरून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असून, त्यांनी एसटी महामंडळाचे आभार मानले आहेत. दरम्यान, बसची पहिलीवहिली फेरी घेऊन आलेल्या चालक-वाचकांचे ग्रामस्थांनी अभिनंदन करून बसला फुलांची माळ, हार घालून सजवण्यात आले व नारळ फोडून पूजा करण्यात आली.

नव्याने सुरु करण्यात आलेल्या या बससेवेमुळे जव्हार तालुक्यातील ओझर कुंडाचापाडा, हुबरण, पेरणआंबा तसेच डहाणू तालुक्याला लागून असलेल्या दुर्गम भागातील काही गावपाड्यांची प्रवासाची सोय झाली आहे. यापुर्वी येथील प्रवाशांना खाजगी जीपशिवाय प्रवासाचे इतर कुठलेही साधन उपलब्ध नव्हते किंवा बससेवेसाठी 7 कि.मी. अंतरावर असलेल्या मेढा गावापर्यंत पायपीट करावी लागत होती. त्यामुळे नागरिकांना विविध कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दमछाक होत असे. मात्र एसटी महामंडळाने आता बससेवा सुरु केल्याने या भागातील नागरिकांच्या प्रवासाचा प्रश्‍न कायमचा सुटला आहे.

ओझर कुंडाचापाडा ही नवीन सेवा सुरु केल्याने प्रवासाची अडचण दूर झाली आहे. तसेच विद्यार्थ्यांना कॉलेज व शाळेत जाणेही सोपे झाल्याचे नागरिकांनी सांगितले. या भागात खाजगी जीप आहेत. मात्र त्या कधी सुटणार किंवा नाही सुटणार याचा काही भरवसा नसल्याने एखाद्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्याची देखील शाश्‍वती नव्हती. परंतु बस वेळेतच सेवा देणार असल्याने वेळेचेही बचत होणार असल्याचे सांगत नागरिकांनी एसटी महामंडळाचे आभार मानले आहेत.

ही बससेवा सुरु व्हावी म्हणून येथील ग्रामस्थ सुभाष डोके व अन्य ग्रामस्थांनी वारंवार एसटी महामंडळाला पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यांच्या या प्रयत्नाला अखेर यश आले असुन स्वातंत्र्यनंतर पहिल्यांदाच ओझर कुंडाचापाड्यात बस पोहचली आहे. यावेळी ग्रामस्थ सीताराम गरेल, वसंत भोवर, पांडू भोवर, राजेश पाटारे, शंकर वनगा, लखमा पाटारे, बच्चू दिवा यांच्यासह अन्य गावकरी महिलावर्ग व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून बस चालक आणी वाहक यांचे अभिनंदन केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top