खोडाळ्याला पाणीपुरवठा करणारे तलाव पडले कोरडे!

0
16
  • पाण्याअभावी पाणीपुरवठा बंद!
  • टँकर द्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी!
  • मागणी करूनही मिळेना टँकर
  • ग्रामस्थ संतप्त!

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 9 : तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा गावाला पाणीपुरवठा करणार्‍या तलावातील पाणी साठा संपल्याने येथील नळपाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. त्यातच गावातील विहिरीही कोरड्या पडल्यानेे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे खोडाळा गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामपंचायतीने मोखाडा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मात्र, टँकरची मागणी करुन चार दिवस उलटूनही येथे पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने खोडाळा ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

दरवर्षी पावसाळा सुरू होईपर्यंत खोडाळा गावाला तलावाचे पाणी पुरत असे. तलावाच्या पाण्यावरच येथील नळपाणी योजना कार्यान्वित असल्याने यापुर्वी ग्रामस्थांना तलावातून वर्षभर पुरेसा पाणी पुरवठा केला जात होता. मात्र, यावर्षी मे अखेर तलावाने तळ गाठला आहे. तर पाण्याचा साठा संपल्याने तलावात सर्वत्र गाळच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणारी नळपाणीयोजना बंद पडली असुन पाणी टंचाई उद्भवली आहे. पाण्याअभावी 4 जुनपासुन ग्रामपंचायतीने जलशुध्दीकरण केंद्रातून केला जाणारा पाणी पुरवठा बंद केला आहे. तर गावातील विहिरी देखील कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे.

सुमारे 4 हजार लोकसंख्या असलेल्या खोडाळा गावातील ग्रामस्थांना जवळपास कुठलाही पाण्याचा श्रोत नसल्याने ग्रामपंचायतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली आहे. मात्र, चार दिवस उलटूनही येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे वाहने आहेत ते 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या अप्पर वैतरणा धरणातून पाणी आणत आहेत. तर खाजगी पाणी वाहतुक करणार्‍या गाड्यांमधुन 50 लीटर पाण्यासाठी 20 रूपये मोजून इतर ग्रामस्थ आपली तहान भागवत आहे. मोखाडा तालुका दुष्काळग्रस्त आहे. येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी होताच 48 तासात पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र, प्रशासनाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे खोडाळा ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

गावाला पाणी पुरवठा करणार्‍या तलावातील पाणीसाठा संपला असुन तलावात केवळ गाळच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र गावाजवळ कुठेही इतर पाणीसाठी उपलब्ध नसल्याने 4 जुन रोजी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. मात्र, तो अद्यापपर्यंत सुरू झालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागते आहे.
-प्रभाकर पाटील, सरपंच, खोडाळा.

Print Friendly, PDF & Email

comments