दिनांक 21 September 2019 वेळ 6:31 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » थोडक्यात महत्वाच्या बातम्या. (दि. 23/5/2019)

थोडक्यात महत्वाच्या बातम्या. (दि. 23/5/2019)

दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी 3.6 लाखांची रोकड लांबवली

वसई, दि. 23 : बँकेत पैसे भरण्यासाठी निघालेल्या एका 70 वर्षीय वृद्धाकडील 3 लाख 60 हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून पळ काढल्याची घटना येथे घडली आहे. काल, 22 मे रोजी सकाळी 10.45 च्या सुमारास ही घटना घडली. सदर वृद्ध रिक्षाने बँक परिसरात पोहोचल्यानंतर रिक्षातून उतरत असताना काही कळण्याच्या आतच एका दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातील बॅग हिसकली व घटनास्थळावरुन धुम ठोकली. याप्रकरणी वसई पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.

विरार : दिवसाढवळ्या 3.22 लाखांची घरफोडी

विरार, दि. 23 : येथील एका घरात चोरट्यांनी दिवसाढवळ्या चोरी करत 3 लाख 22 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पुर्वेतील चंदनसार भागातील एका घरातील सदस्य 22 मे रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास काही कामानिमित्त घराबाहेर असताना अज्ञात चोरट्यांनी सदर घरातील एका खिडकीतून आत प्रवेश केला व कपाटात ठेवलेली 80 हजारांची रोख रक्कम व 2 लाख 42 हजार रुपयांचे दागिने असा एकुण 3 लाख 22 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी विरार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करत आपला तपास सुरु केला आहे.

गॅरेजमधुन 1 लाखांची रोकड चोरली

वसई पुर्वतील एका गॅरेजमध्ये काम करणार्‍या तरुणाने गॅरेजचा मालक कामानिमित्त बाहेर गेल्याचा फायदा घेत येथील एका ड्रॉवरमध्ये ठेवलेली 1 लाखांची रोकड लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितू ऑटो मोबाईल नामक गॅरेजमध्ये 4 मे रोजी ही घटना घडली असुन काल, 22 मे रोजी ड्रॉवरमधील रोकड गायब असल्याचे गॅरेज मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने याबाबत पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी तरुणाचा शोध सुरु केला आहे.

नालासोपार्‍यात 35 हजारांची चोरी

नालासोपारा पुर्वेतील एका घरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी खिडकीवाटे प्रवेश करत 35 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला आहे. यात 7 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच ओप्पो कंपनीचा 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, विवो कंपनीचा 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल व सॅमसंग कंपनीचा 8 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, अशा तीन मोबाईला समावेश आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात तुळींज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई : कारच्या धडकेत तरुण ठार

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसई हद्दीत रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या एका 21 वर्षीय तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे. 17 मे रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. सदर तरुण महामार्ग ओलांडत असताना घोडबंदरहून अहमदाबादच्या दिशेने जाणार्‍या एम.एच.02/सी.पी. 5800 या क्रमांकाच्या होंडा सिटी कारने त्याला धडक दिली होती. याप्रकरणी कारच्या चालकाविरोधात वालीव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन काल, 22 मे रोजी त्याला अटक करण्यात आली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top