दिनांक 21 September 2019 वेळ 6:27 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » 10 लाखांचे मोबाईल चोरणार्‍या तीन आरोपींना अटक

10 लाखांचे मोबाईल चोरणार्‍या तीन आरोपींना अटक

वसई, दि. 21 : वसई रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एका मोबाईलच्या दुकानात चोरी करुन 10 लाख रुपये किंमतीचे विविध कंपन्यांचे 107 स्मार्टफोन लंपास करणार्‍या 3 आरोपींना अटक करण्यात माणिकपुर पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाला यश आले आहे. तर या गुन्ह्यातील अन्य एक आरोपी अद्याप फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीला गेलेल्या मोबाईल्स पैकी 2 लाख 50 हजारांचे 25 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

वसई रोड रेल्वे स्टेशनच्या पश्‍चिमेस असलेल्या नाकोडा वॉच अ‍ॅण्ड ईन्फोफार्म या दुकानात 21 जानेवारी 2019 रोजी दुकानाचा लोखंडी पत्रा कापुन अज्ञात चोरट्यांनी ओप्पो, विवो, रीअल मी, मोबीस्टार, आणि सॅमसंग अशा प्रसिध्द मोबाईल कंपन्याचे एकुण 107 स्मार्ट मोबाईल फोन चोरी केले होते. याप्रकरणी माणिकपुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माणिकपुर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने चोरीला गेलेल्या मोबाईल फोन्सचे आयएमईआय नंबर ट्रॅक केले असता त्यातील 30 ते 35 मोबाईल बिहार राज्यातील मुजफ्फरपुर येथे वापरात असल्याचे समोर आले होते. यानंतर सदर पथकाने तात्काळ मुजफ्फरपुर गाठत चोरीचे हे मोबाईल विकणार्‍या अरमान अत्ताऊर रहमान (वय 20) व नवसाद ऊर्फ सलीम जमशेद शेख (वय 34) या दोघांना अटक केली. या दोघांच्या चौकशीत राधेश्याम ऊर्फ अजय प्रसाद सहाना (वय 31, रा. नालासोपारा) या चोरट्याने त्याच्या अन्य एका साथिदाराच्या मदतीने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले असुन राधेश्याम ऊर्फ अजय प्रसाद सहाना याला नालासोपारा पुर्वेतील धानीव बाग येथुन अटक करण्यात आली आहे. तर त्याचा साथिदार अद्याप फरार आहे. दरम्यान, फरार आरोपीची संपुर्ण माहिती पोलिसांना प्राप्त झाली असुन तो उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यानुसार पोलिसांचे एक पथक लवकरच बस्ती येथे रवाना होणार आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी अट्टल गुन्हेगार असुन त्यांच्या चौकशीत आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली असुन त्यानुसार तिघांचीही कसुन चौकशी सुरु आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top