दिनांक 21 September 2019 वेळ 5:52 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज!

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज!

1600 अधिकारी, कर्मचारी व पोलीस तैनात

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची माहिती

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 21 : लोकसभेच्या पालघर मतदारसंघातील मतमोजणी येथील सूर्या कॉलनीतील शासकीय गोदाम क्र. 2 येथे 23 मे रोजी होणार असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक गौरव सिंग व निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, मतमोजणी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत होणार असून पोलीस व इतर सुरक्षा दलाच्या जवानांसह सुमारे 1600 अधिकारी-कर्मचारी मतमोजणी यशस्वीरीत्या पार पाडणार आहेत. सहा विधानसभा मतदारसंघ निहाय होणार्‍या या मतमोजणीसाठी प्रत्येकी 14 टेबल असणार आहेत. नालासोपारा मतदारसंघात सर्वाधिक 35 तर पालघर मतदारसंघात सर्वात कमी 23 फेर्‍या होतील. याशिवाय डहाणू मतदारसंघात 24 तर विक्रमगड, बोईसर आणि वसई मतदारसंघात प्रत्येकी 25 फेर्‍या होतील, असे जिल्हाधिकारी म्हणाले. दरम्यान, आज मंगळवारी मतमोजणीची रंगीत तालिम घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पालघर लोकसभा मतदारसंघासाठी 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीत विक्रमगड, पालघर, डहाणू, बोईसर, नालासोपारा, वसई अशा सहा विधानसभा मतदारसंघातील एकूण 18 लाख 85 हजार 297 मतदारांपैकी 12 लाख 1 हजार 298 (63.72 टक्के) मतदारांनी मतदान केले आहे.

  • अशी होणार मतमोजणी
    मतमोजणी ठीक सकाळी 8 वाजता सुरू केली जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी 14 टेबल निहाय आराखडा तयार करण्यात आलेला आहे.
  • मतमोजणीसाठी अधिकारी कर्मचारी तैनात
    मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलनिहाय पर्यवेक्षक, सहाय्यक पर्यवेक्षक व सुक्ष्म निरीक्षक असे अधिकारी असणार आहेत. याव्यतिरिक्त संगणकीय कामासाठी, इव्हीएम स्ट्राँगरूममधून आणणे, त्यांची सुरक्षा, टपाली मतपत्रिका मतमोजणी आदी कामांची जबाबदारी सुक्ष्म निरीक्षक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व मतमोजणीच्या विविध समित्यांमधील कर्मचारी सांभाळणार आहेत.

निवडणूक आयोगाच्या निकषानुसार ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँगरुमला त्रिस्तरीय सुरक्षा बंदोबस्त व्यवस्था पुरविण्यात आलेली आहे. याशिवाय प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणी पथकाला विशिष्ट रंगाचे टीशर्ट्स तसेच बॅचेस देण्यात येणार आहेत, जेणे करून कुठलाही संभ्रम होणार नाही, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

तसेच मतमोजणी केंद्रात कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला असून मतमोजणीच्या दिवशीदेखील अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक, मतमोजणी कर्मचारी या सर्वांना आयोगाच्या तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करावयाचे आहे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

  • मोबाईल वापरावर बंदी
    निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्र परिसरात उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणी अधिकारी व कर्मचारी यांना मोबाईल फोन व लॅपटॉप आणता येणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पालघर पोलीस दलही सज्ज

23 मे रोजी होणार्‍या मतमोजणीकरीता 1 अपर पोलीस अधिक्षक, 2 उपविभागीय पोलीस अधिकारी, 10 पोलीस निरीक्षक, 27 पोलीस अधिकारी, 137 पोलीस कर्मचारी, 51 महिला पोलीस कर्मचारी, 10 पोलीस वाहतुक शाखेचे कर्मचारी, असा शेकडो पोलीस अधिकारी- कर्मचार्‍यांचा बंदोबस्त मतमोजणी केंद्रावर तैनात करण्यात आला असल्याची माहिती पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे देण्यात आली आहे.

निवडणुक आयोगाकडील निर्देशानुसार निवडणुक लढवणारे उमेदवार, त्यांचे निवडणुक प्रतिनिधी तसेच सर्व मतमोजणी प्रतिनिधींना मतमोजणी केंद्र व परिसरात मोबाईल फोन, ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डर, लॅपटॉप, कॅमेरा, हँड कॅमेरा आदी वस्तु आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यानुसार मत मोजणी केंद्र व परिसरात प्रवेश करणार्‍या व्यक्तींची कसुन तपासणी करण्यात येईल. तसेच निवडणुक आयोगाकडील सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सर्व संबंधित पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचार्‍यांना योग्य त्या सुचना देण्यात आल्या असुन सहाही विधानसभा मतदार संघातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत कोणताही अनुचीत प्रकार घडु नये याकरीता पोलीस दलाकडुन योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. एकंदरीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित परिस्थिती हाताळण्याकरीता पालघर जिल्हा पोलीस दल सज्ज झालेले असल्याची माहिती जिल्हा पोलिसांतर्फे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top