दिनांक 21 September 2019 वेळ 6:14 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वज्रेश्वरी मंदिरातील दरोडाप्रकरणातील पाच आरोपी गजाआड!

वज्रेश्वरी मंदिरातील दरोडाप्रकरणातील पाच आरोपी गजाआड!

प्रतिनिधी/वाडा, दि.21 : भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिरात 10 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकत येथील दान पेटीतील लाखो रुपयांची रोकड लंपास केली होती. याप्रकरणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत पाचही दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या असुन या दरोड्यातील अन्य 3 फरार आरोपींचा पोलिसांकडुन कसुन शोध घेण्यात येत आहे.

गोविंद सोमा गिंभल (वय 35, रा. जव्हार), विनीत सुरजी चिमडा (वय 19), भारत लक्ष्मण वाघ (वय 22), जगदीश काशिनाथ नावतरे (वय 26), प्रविण काशिनाथ नावतरे (वय 22, चौघेही रा. ता. शहापूर, जि. ठाणे) अशी अटक दरोडेखोरांची नावे आहेत. त्यांना शहापूर परिसर आणि दादरा नगर हवेली येथून अटक करण्यात आली आहे. या पाच दरोडेखोरांनी आपल्या इतर तीन साथिदारांच्या मदतीने घटनेच्या काही दिवसांपुर्वी वज्रेश्वरी मंदिराची रेकी केली होती व मंदिराच्या दानपेटीमध्ये जमा होणारी रक्कम चोरी करण्याचा कट रचला होता. त्यानुसार 10 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मोटारसायकल आणि कारचा वापर करुन हे दरोडेखोर वज्रेश्वरी मंदिराजवळ आले. त्यांनी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या डोंगर भागातून मंदिराच्या आवारात प्रवेश करुन, बेसावध असलेल्या मंदिराच्या सुरक्षा रक्षकावर बळाचा वापर करुन त्याचे हात, पाय वायर आणि दोरीने बांधून सोबत आणलेल्या स्कु्र ड्रायव्हर व लोखंडी कटावणीच्या सहाय्याने मंदिराचा लाकडी दरवाजा तोडून मंदिरामध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी मंदिरातील दानपेट्या फोडून त्यातील 7 लाखांहून अधिकची रक्कम सोबत आणलेल्या गोणींमध्ये भरली व घटनास्थळावरुन पळ काढला होता. दरम्यान त्याच दिवशी दरोड्यामध्ये मिळालेल्या पैशांची वाटणी करुन, सर्व दरोडेखोर दादरा नगर हवेली आणि जव्हार येथे पळून गेले होते.

दुसरीकडे धार्मिक स्थळावर दरोडा टाकत पोलिसांसमोर आव्हान निर्माण करणार्‍या या घटनेची ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी गंभीर दखल घेत दरोडोच्या तपासासाठी तात्काळ विशेष पथकांची नेमणुक केली होती. त्यानुसार या पथकाने उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे शिताफीने तपास करत दरोडोखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. तर अटक दरोडोखारांच्या चौकशीत आणखी तीन आरोपी या गुन्ह्यात सामिल असल्याची माहिती पुढे आल्यानंतर पोलिसांकडून या फरार आरोपींचा कसुन शोध घेण्यात येत आहे.

3 लाख 83 हजारांचा ऐवज हस्तगत
या दरोडेखोरांकडून दरोड्यातील रक्कमेपैकी 2 लाख 83 हजार रुपये रोख तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली असा एकुण 3 लाख 83 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

27 मे पर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान, पाचही दरोडेखोरांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे दरोडोखोर सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापुर्वी जबरी चोरी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न आदी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे देखील समोर आले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top