दिनांक 21 September 2019 वेळ 5:57 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » भरधाव कारची दुचाकीला धडक, एक ठार, एक गंभीर जखमी

भरधाव कारची दुचाकीला धडक, एक ठार, एक गंभीर जखमी

प्रतिनिधी/वाडा, दि. 20 : तिळसा येथील शिवमंदिरासमोर भरधाव वेगात असलेल्या इको कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघा भावंडांपैकी एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. गणपत तुकाराम मलावकर (वय 35) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव असुन भारत तुकाराम मलावकर (वय 42) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाडा तालुक्यातील वरई खूर्द येथील रहिवासी असलेले गणपत मलावकर व भारत मलावकर हे दोघे सख्खे भाऊ रविवारी (दि.19) सायंकाळी 8 च्या सुमारास दुचाकीवरुन वाड्याच्या दिशेनेे येत असताना तिळसा येथील पुलावर समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या मारुती सुझुकी कंपनीच्या ईको कारने (विना नंबर) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघा भावंडांना गंभीर दुखापत झाल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पठारे व गावकर्‍यांनी तात्काळ दोघांना वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता गणपत मलावकर यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. तर भरत मलावकर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

अपघातानंतर ईको कार चालक गाडी रस्त्यातच सोडून फरार झाला असुन याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरुद्ध वाडा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 304 अ, 279, 337, 338 व मोटारवाहन अधिनियम कायद्याच्या 184, 187 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप
दरम्यान, दोघा रुग्णांना मी व गावकर्‍यांनी वाडा ग्रामीण रुग्णालयात तात्काळ नेले. मात्र येथील वैद्यकीय अधिकारी घुगे यांनी रुग्णाला दाखल करुन घेण्यास व तपासण्यात दिरंगाई केल्यानेच रुग्ण दगावला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर जिल्हा ओ.बी.सी. सेलचे अध्यक्ष पांडुरंग पठारे यांनी केला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top