दिनांक 21 September 2019 वेळ 6:25 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पावसाळी कामे करण्यासाठी महावितरणला ठेकेदार मिळेना

पावसाळी कामे करण्यासाठी महावितरणला ठेकेदार मिळेना

वार्ताहर/बोईसर, दि. 19 : पालघर व वसई सर्कलमध्ये महावितरण कंपनीने विद्युत उपकरणांची दुरुस्ती व डागडुजी करण्यासाठी तीन वर्षांच्या कंत्राटाबाबत निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र पावसाळा तोंडावर आला असताना अद्यापपर्यंत महावितरणला ठेकेदार मिळाला नसल्याचे समोर आले आहे. याविषयी महावितरणचे पालघर जिल्हा अभियंता किरण नागावकर यांच्याशी संपर्क साधला असता कामांचे दर वाढवल्याने या आठवड्यात ठेकेदार निविदा भरतील, अशी आशा असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाळ्यात विद्युत उपकरणे निकामी होण्याचे तसेच जीर्ण झालेले खांब व विद्युत वाहिन्या तुटण्याचे अनेक प्रकार घडत असतात. त्यामुळे पावसाळ्यापुर्वीच अशा उपकरणांची दुरुस्तीची कामे पुर्ण करण्यासाठी महावितरण कंपनीने राज्यभरात या कामांचा तीन वर्षांचा ठेका देण्याचे निश्चित केले आहे. त्यादृष्टीने प्रत्येक मंडळनिहाय निविदा काढण्यात येत असून याअंतर्गत सबस्टेशन, हाय टेन्शन विद्युत सामग्री, लो टेन्शन विद्युत सामग्री तसेच ट्रान्सफॉर्मर क्षेत्रातील कामे करावयाची आहेत. या कामांकरिता अनेकवेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असून या निविदांची वेळ व काही मर्यादा देखील वेळोवेळी वाढवण्यात आल्या आहेत. मात्र असे असताना याकामी एकाही ठेकेदाराने पालघर व वसई सर्कलकरिता निविदा भरलेली नाही.

या कामांसाठी महावितरण कंपनीने निश्चित केलेला दर कमी असल्याचे सांगत विद्युत क्षेत्रातील ठेकेदारांनी या निविदा न भरण्याचे ठरवले असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात अधिक्षक अभियंता (मुख्यालय) यांनी वसई येथे सर्व संबंधित ठेकेदारांची बैठक घेऊन या सर्व कामांसाठी दरवाढ करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र ठेकेदारांच्या संस्थेच्या पदाधिकार्‍यांकडून हिरवा कंदील दाखवला जात नाही तो पर्यंत निविदा न भरण्याचा निर्णय घेतला गेल्याचे समजते.

पालघर महावितरण मंडळ क्षेत्रात वसई व वाडा तालुके वगळता उर्वरित सहा तालुक्यांमध्ये सुमारे तीन लाख विद्युत ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांचे मिटर रिडिंग घेऊन त्यांना बिले पोहोचवण्यापर्यंतचे काम सध्या कार्यालयीन (तालुका) स्तरावर कंत्राटी पद्धतीने केले जात आहे. यासाठी मंडळ पातळीवर एकत्रित ठेका देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मात्र या निविदांना देखील प्रतिसाद मिळत नसल्याचे विचारले असता, आता दर वाढवले असुन या आठवड्यामध्ये ठेकेदार निविदा भरतील अशी आशा आहे, असे अभियंता नागावकर यांनी सांगितले.

comments

About Rajtantra

Scroll To Top