दिनांक 21 September 2019 वेळ 6:45 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » जिल्ह्यातील टंचाईवरील उपाययोजनांची पालक सचिवांनी केली पाहणी

जिल्ह्यातील टंचाईवरील उपाययोजनांची पालक सचिवांनी केली पाहणी

  • जव्हार येथे घेतली आढावा बैठक
  • पाणी टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी गरजेनुसार टँकर उपलब्ध करून देणार! -पालक सचिव मनीषा वर्मा

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 19 : जिल्ह्यातील पाणी टंचाईवरील उपाययोजनांची आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव तथा पालघर जिल्ह्याच्या पालक सचिव श्रीम. मनीषा वर्मा यांनी नुकतीच प्रत्यक्ष पाहणी केली. शासनाने पालघर जिल्ह्यातील पालघर, विक्रमगड आणि तलासरी तालुक्यात पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहीर केला आहे. तर जव्हार, मोखाडा आणि वसई तालुक्यातील 35 गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केली आहे. या गावांमध्ये गरजेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून शासनाने जाहीर केलेल्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. तसेच आवश्यकतेनुसार टँकरची संख्या वाढविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचे वर्मा यांनी यावेळी सांगितले. यासाठी निधीची कमतरता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वन पट्टे वाटप झालेल्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ प्राधान्याने देण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी याप्रसंगी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील टंचाई परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेऊन पालक सचिवांना आपल्या जिल्ह्यातील कामांचा आढवा घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीची पाहणी करून वर्मा यांनी शुक्रवारी (दि. 17) जव्हार येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून विविध सोयी, सुविधा, सवलतींद्वारे रहिवाशांना दिलासा देण्याचे निर्देश सर्व संबंधित यंत्रणांना दिले. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासन आणि क्षेत्रीय यंत्रणा योग्य नियोजन करून चांगले काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, अपर जिल्हाधिकारी श्रीधर डुबे पाटील, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पर्जन्यमान :-
जिल्ह्यात मागील वर्षी एकूण सरासरी 96.87 टक्के पर्जन्यमान झाले असून तालुकानिहाय वसई-98.40 टक्के, पालघर-117.40 टक्के, डहाणू-115.20 टक्के, तलासरी-139.50 टक्के, वाडा-77.90 टक्के, विक्रमगड-79 टक्के, जव्हार-85.50 टक्के तर मोखाडा तालुक्यात हे प्रमाण 95.70 टक्के असे आहे.

पाणीसाठा :-
जिल्ह्यात एकूण आठ प्रकल्पांमध्ये 22.07 टक्के उपयुक्त पाणीसाठा असून एक मोठा प्रकल्प-24.07 टक्के, एक मध्यम प्रकल्प- 4.11 टक्के, तर सहा लहान प्रकल्पांमध्ये 24.81 टक्के असे हे प्रमाण आहे.

टंचाई कृती आराखडा :-
ऑक्टोबर 2018 ते जून 2019 या कालावधीतील टंचाई कृती आराखड्यामध्ये पालघर तालुक्यातील 40 गावे आणि 90 पाडे, वसई तालुक्यातील 35 गावे आणि 23 पाडे, डहाणू तालुक्यातील 87 पाडे, तलासरी तालुक्यातील 30 पाडे, वाडा तालुक्यातील 35 गावे आणि 106 पाडे, विक्रमगड तालुक्यातील 13 गावे आणि 131 पाडे, जव्हार तालुक्यातील 30 गावे आणि 52 पाडे तर मोखाडा तालुक्यातील 43 गावे आणि 64 पाडे अशा एकूण 196 गावे आणि 583 पाड्यांमध्ये 779 विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी 875.15 लाख रूपये इतका खर्च अपेक्षित आहे.

30 जून पर्यंत पाणी टंचाई भासणार्‍या संभाव्य गाव/पाड्यांची संख्या 779 इतकी असून यामध्ये विहीर अधिग्रहण, टँकरद्वारे पाणी पुरवठा, नळ पाणी पुरवठा योजना विशेष दुरूस्ती करणे, नवीन विंधन विहिरी घेणे, तात्पुरती पुरक नळपाणी पुरवठा योजना करणे अशा उपाययोजनांचा समावेश आहे.

पाणी पुरवठा :-
जिल्ह्यातील 46 गावे आणि 129 वाड्यांना दिनांक 16 मे रोजीपर्यंत 41 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर तीन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये वाडा तालुक्यात चार गावे आणि 28 वाड्यांना चार टँकर्सद्वारे सरासरी 13 फेर्‍या, विक्रमगड तालुक्यात एक गाव आणि आठ वाड्यांना एका टँकरद्वारे सरासरी 19 फेर्‍या, जव्हार तालुक्यात 10 गावे आणि 20 वाड्यांना सहा टँकर्सद्वारे सरासरी 23.5 फेर्‍या, मोखाडा तालुक्यात 28 गावे आणि 67 वाड्यांना 26 टँकर्सद्वारे सरासरी 90 फेर्‍या तर मोखाडा नगर पंचायत क्षेत्रात तीन गावे आणि सहा वाड्यांना चार टँकर्सद्वारे सरासरी 13 फेर्‍यांद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जव्हार तालुक्यातील एक तर मोखाडा तालुक्यातील दोन अशा एकूण तीन खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

वीजबिलांमध्ये सवलत :-
पालघर व तलासरी तालुक्यांमधील एकूण 5943 ग्राहकांना फेब्रुवारी 2019 च्या वीज बिलाद्वारे एकूण रूपये 24 लाख 44 हजार 364 रुपयांची सूट देण्यात आली आहे. तर पालघर, तलासरी व विक्रमगड तालुक्यांमध्ये शेती पंप ग्राहकांच्या वीज जोडण्या खंडित करण्यात आल्या नाहीत.

दुष्काळ अनुदान वाटप :-
पालघर तालुक्यात 205 गावांमधील याद्या तयार झालेल्या 30 हजार 128 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात खरीप 2018 हंगामातील दुष्काळ अनुदान वाटपाची मदत जमा करण्यात आली असून मंजूर अनुदानाच्या तुलनेत हे प्रमाण 98.72 टक्के इतके आहे. विक्रमगड तालुक्यात 86 गावांतील 14 हजार 752 शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये मदत जमा झाली असून त्याचे प्रमाण 80.90 टक्के आहे. तर तलासरी तालुक्यात 42 गावांमध्ये 6 हजार 294 शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये मदत जमा झाली असुन त्याचे प्रमाण मंजूर अनुदानाच्या तुलनेत 75.30 टक्के असे आहे. जिल्ह्यात याद्या तयार करण्यात आलेल्या एकूण 333 गावांमध्ये 51 हजार 174 शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये 21 कोटी 9 लाख 59 हजार 180 रूपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. ही टक्केवारी प्राप्त अनुदानाच्या 88.53 टक्के इतकी आहे.

विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी :-
जिल्ह्यात एकूण 212 शाळांमधील 10 वीच्या 12 हजार 958 विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क तर 82 शाळांमधील 12 वीच्या 9 हजार 971 विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे.

जमीन महसुलामध्ये सूट :-
जिल्ह्यात पालघर, विक्रमगड, तलासरी, वसई, जव्हार आणि मोखाडा या सहा तालुक्यांमधील 543 गावांमध्ये 95 हजार 750 खातेदारांच्या 21.49 लाख इतक्या जमीन महसुलामध्ये सूट देण्यात आली आहे.

मग्रारोहयो अंतर्गत कामांवर 58 हजारांहून अधिक मजुरांची उपस्थिती :-
पालघर जिल्ह्यात मग्रारोहयो अंतर्गत 194 ग्रामपंचायतींमध्ये 9 मे ते 15 मे 2019 या कालावधीत सुरू असलेल्या एकूण 922 कामांवर 58 हजार 43 मजुरांची उपस्थिती होती. तर 16 मे रोजी 671 कामांवर 9 हजार 846 मजूर उपस्थित होते. शेल्फवरील कामांची संख्या 18 हजार 618 इतकी असून मजूर संख्या वाढविण्यासाठी ’कामावर या’ सारखे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पालघर जिल्ह्यात पाणी टंचाई, दुष्काळ निवारण व रोहयो अंतर्गत कामे उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सवलती लागू करण्यात आल्या असून मागणीनुसार पाण्याचे टँकर्स तातडीने उपलब्ध करून देण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यावेळी केलेल्या सादरीकरणाद्वारे दिली. पशुधनासाठी लागणार्‍या पाण्याचाही विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मोखाडा तालुक्यातील पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच प्रत्येक गावात पाणी पुरवठा योजनेसाठी नियोजन करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

पालक सचिवांनी केली विविध कामांची पाहणी :-
पालक सचिव वर्मा यांनी टंचाई आढावा बैठकीपूर्वी जव्हार तालुक्यातील वाळवंडा गावातील बंधार्‍यातील गाळ काढण्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या कामावर 330 मजूर उपस्थित असून या कामाचा अंदाजित खर्च 13 लाख 85 हजार रुपये आहे. वर्मा यांनी संबंधित अधिकार्‍यांकडून कामाची माहिती करून घेतली तसेच वळवंडाच्या सरपंच गुलाब विष्णू वैजल यांच्याशीही संवाद साधला. त्यांनी जव्हार तालुक्यातील कासरवाडी येथील टँकरने पाणीपुरवठा केला जाणार्‍या विहिरीची देखील पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून पाणी पुरवठ्याबाबत चौकशी केली. ग्रामस्थांच्या मुलांची चौकशी करताना वर्मा यांनी लहान मुले शाळेत जात जातात किंवा नाही याबाबतही विचारपूस केली.

comments

About Rajtantra

Scroll To Top