व्यवस्थापकाचे अपहरण व खून प्रकरण, फरार आरोपीची आत्महत्या

0
729

राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 16 : पालघर येथील अल्फा मेटल कंपनीचे व्यवस्थापक आरिफ मोहम्मद अली यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी आतापर्यंत एकुण 11 जणांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील फरार आरोपींपैकी एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिवा ठाकूर (वय 35, रा. बिरवाडी) असे सदर आरोपीचे नाव असुन शिवा ठाकूरने अटकेच्या भितीने त्याच्याच वाडीतील एका झाडाला गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. शिवा ठाकूरने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासह पुरावे लपवण्यात मुख्य आरोपींची मदत केली होती.

पालघरमधील अल्फा मेटल कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला असलेल्या आरिफ मोहम्मद अली (रा. नालासोपारा) यांचे 9 मे रोजी दुपारच्या सुमारास टेंभोडे काशीपाडा सातपाटी रोडवरून रिक्षाने प्रवास करत असताना पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पियो गाडीतून आलेल्या 4 अज्ञात अपहरणकर्त्यांनी अपहरण केले होते. याप्रकरणी पालघर पोलिसांनी तपास करत 13 मे रोजी मुख्य आरोपी प्रशांत संखे, चिनु उर्फ रामदेव संतोष संखे, प्रशांत गोरख महाजन व अन्य एक जण अशा 4 जणांना अटक केली होती. या चौघांच्या चौकशीत व्यावसायिक वादातून अली यांचे अपहरण करुन त्याच वाहनात त्यांचा खून केल्याचे व आणखी काही जणांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर होते. त्यानुसार काल, बुधवारी (दि. 15) आणखी सात जणांना पोलिसांनी अटक केली होती.

दरम्यान, आरिफ यांचे अपहरण केल्यानंतर त्याच वाहनामध्ये त्यांचा श्‍वास रोखून खून करण्यात आला होता व त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शिवा ठाकूरची मदत घेण्यात आली होती. शिवा ठाकूरने मृतदेह जाळण्यासाठी डिझेल व इतर साहित्य उपलब्ध करुन दिले होते. तसेच मृतदेह जाळल्यानंतर उमरोळी बिरवाडी जवळील एका जुन्या पडीक इमारतीच्या टाकीमध्ये फेकण्यात आला होता. या गुन्ह्याशी संबंधित पुरावे देखील शिवा ठाकूरने लपवून ठेवले होते.

या घटनेनंतर आरोपी शिवा ठाकूर फरार झाला होता. मात्र खूनातील सर्व आरोपींना अटक होत असल्याचे समजल्यानंतर अटकेच्या भितीने घाबरलेल्या शिवाने स्वत:च्याच वाडीतील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments