दिनांक 26 May 2020 वेळ 9:23 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर जिल्ह्यातील थोडक्यात महत्वाच्या बातम्या. (दि. 15/5/2019)

पालघर जिल्ह्यातील थोडक्यात महत्वाच्या बातम्या. (दि. 15/5/2019)

कासा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

डहाणू, दि. 15 : तालुक्यातील कासा येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला जिवेठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार करणार्‍या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासुन आरोपी इसम पीडित मुलीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. त्यातच गेल्या शुक्रवारी (10 मे) रात्री 10 वाजेच्या सुमारास पीडित मुलगी एकटीच असल्याचा फायदा आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने एवढ्यावरच न थांबता घडल्या प्रकाराबाबत कुठेही वाच्यता केल्यास तुला जिवे ठार मारेन, अशी धमकी देत त्या रात्री व त्याच्या दुसर्‍या दिवशी अनेकवेळा तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी काल, पीडित मुलीच्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात कासा पोलीस स्टेशनमध्ये बलात्कारासह पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस अधिक तपास करत आहेत.

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

डहाणू, दि. 15 : सासरच्या मंडळीकडून होणार्‍या जाचाला कंटाळून 23 वर्षीय विवाहित महिलेने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कासा येथे घडली आहे. सासरची मंडळी कोणत्याना कोणत्या कारणांवरुन छळ करत असल्याने मागील काही दिवसांपासुन सदर विवाहिता आपल्या माहेरी रहात होती. त्यातही तिच्या सासरची मंडळी नेहमी तिला तु सासरी रहायला आली नाहीस तर, तुला मारुन टाकू अशा धमक्या देत असल्याने अखेर 12 मे रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास तिने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. याप्रकरणी मृत महिलेच्या पती व सासर्‍याविराधात कासा पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस अधिक तपास करीत आहे.

घोलवड पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर कारवाई

घोलवड, दि. 15 : परवाना नसताना अवैधरित्या रेती वाहतूक करणार्‍या एका बोलेरो पिकअप वाहनावर पोलिसांनी कारवाई करत 3 हजार रुपये किंमतीची अर्धा ब्रास रेती जप्त केली. दरम्यान, पोलीस कारवाईची चाहूल लागल्याने पिकअप चालक गाडी सोडून फरार झाला आहे. काल, 14 मे रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास घोलवड पोलिसांचे पथक गस्तीवर असताना एम.एच. 48/ओ. 003 या क्रमांकाच्या बोलेरो पिकअप टेम्पोच्या चालकाने पोलिसांना बघुन गाडी भरधाव वेगात चालवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग केला असता टेम्पोचालकाने घोलवड रेल्वे स्टेशन ब्रीजच्या खाली गाडी थांबवून अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला. यावेळी पोलिसांनी गाडीची पाहणी केली असता त्यात 3 हजार रुपये किंमतीची रेती आढळून आली. यानंतर पोलिसांनी टेम्पो जप्त करत टेम्पोचालक कल्पेश नारायण वळवी (रा. कोसबाड) याच्याविरोधात घोलवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

पैशांसाठी विवाहितेचा छळ, सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा

डहाणू, दि. 15 : मागील 2 वर्षांपासुन घरगुती कारणांवरुन व माहेरुन पैसे आणण्यासाठी सुनेचा मानसिक व शारिरीक छळ करणार्‍या सासरच्या मंडळीविरोधात डहाणू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डहाणू तालुक्यातील आशागडमधील साईनगर भागात राहणार्‍या पीडित विवाहितेला तिचा पती, सासु-सासरे व चुलत सासु सासरे मागील 2 वर्षांपासुन घरगुती कारणांवरुन वाद घालून तसेच माहेरुन पैसे आणण्याची मागणी करुन मानसिक व शारिरिक छळ करत होते. हा प्रकार असह्य झाल्याने पीडित विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरुन डहाणू पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास करण्यात येत आहे.

वसई : अपघातात 1 ठार

वसई, दि. 15 : येथे रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाला असुन अंदाजे 30 ते 35 वय असलेल्या मृत इसमाची ओळख पटू शकलेली नाही. काल, मंगळवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी वालीव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top