व्यवस्थापकाचे अपहरण व खून प्रकरण, आणखी 7 आरोपींना अटक

0
1296

वार्ताहर/बोईसर, दि. 15 : पालघर येथील अल्फा मेटल कंपनीचे व्यवस्थापक आरिफ मोहम्मद अली शेख यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी आज, बुधवारी आणखी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. तर यापुर्वी चार जणांना पोलिसांनी अटक केली असुन चौघांनाही न्यायालयाने 22 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

9 मे रोजी रिक्षातून आपल्या कंपनीमध्ये जात असताना याच कंपनीत मनुष्यबळ पुरवठा ठेकेदार असलेल्या प्रशांत संखे याने आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने आरिफ शेख यांचे अपहरण केले होते. त्यानंतर अपहरण केलेल्या वाहनामध्येच त्यांचा खून करुन मृतदेहाची उमरोळी बिरवाडी जवळील एका जुन्या पडीक इमारतीच्या टाकीमध्ये टाकून विल्हेवाट लावण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून 13 मे रोजी मुख्य आरोपी प्रशांत संखे, चिंनु उर्फ समदेव संतोष संखे, प्रशांत गोरख महाजन व अन्य एक जण अशा 4 जणांना अटक केली होती. या चौघांच्या चौकशीत आणखी 7 जणांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर सातही जणांना पोलिसांनी आज अटक केली आहे. अपहरण, खून व नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात या सात जणांचा समावेश असल्याचा आरोप आहे. तर या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असुन सदर आरोपी परराज्यात फरार झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

पालघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, याप्रकरणी 13 मे रोजी अटक करण्यात आलेल्या 4 जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 22 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments