दिनांक 26 May 2020 वेळ 8:44 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष! -जिल्हाधिकारी

टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष! -जिल्हाधिकारी

मागणीनुसार टँकर उपलब्ध

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 13 : राज्यात जाणवत असलेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासन दक्ष असून मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात चार तालुके आणि एक नगर पंचायतीमधील 67 हजार 789 लोकसंख्येला 40 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. मागणीनुसार टँकरची उपलब्धता करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात सर्व संबंधितांची जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक घेण्यात आली. यात सर्वांना दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले असून संबंधित तालुक्यांमध्ये टंचाई निवारणासाठी कक्ष निर्माण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

पाणी टंचाई असलेल्या मोखाडा तालुक्यातील 28 गावे आणि 67 पाड्यांमध्ये 26 टँकरद्वारे, जव्हार तालुक्यातील 11 गावे आणि 19 पाड्यांमध्ये 6 टँकरद्वारे, वाडा तालुक्यातील 4 गावे आणि 28 पाड्यांमध्ये 4 टँकरद्वारे, विक्रमगड तालुक्यातील 1 गाव आणि 4 पाड्यांमध्ये एका टँकरद्वारे तर मोखाडा नगर पंचायतीमध्ये 2 गाव आणि 4 पाड्यांमध्ये 3 टँकरद्वारे अशा एकूण 46 गावे आणि 122 पाड्यांमध्ये 40 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तातडीने निर्णय होण्यासाठी दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांमध्ये मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यास मंजुरी देण्याचे अधिकार शासनाने उपविभागीय अधिकार्‍यांना दिले आहेत. याशिवाय शासन निर्णयानुसार दुष्काळ सदृष्य परिस्थिती घोषित झालेल्या गावांना विविध सवलती लागू करण्यात येत आहेत.

पाणी टंचाई कृती आराखडा 2018-19 नुसार 198 विंधन विहिरी खोदण्यात आल्या आहेत. तसेच नळ पाणी पुरवठा विशेष दुरूस्ती उपाययोजना या योजनेअंतर्गत 9 नळपाणी पुरवठा विशेष दुरूस्ती उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 3 कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. उर्वरीत कामे सुरू आहेत. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सद्यस्थितीत 3 विहिरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

रोहयोंतर्गत 62 हजारांहून
अधिक मजूरांना कामे

जिल्ह्यात रोहयोअंतर्गत 25 एप्रिल ते 1 मे 2019 या आठवड्यात ग्रामपंचायत आणि यंत्रणांमार्फत 197 ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेल्या 865 कामांवर 62 हजार 471 मजुरांची उपस्थिती होती. तसेच शेल्फवरील कामांची संख्या 18 हजार 474 इतकी होती, अशी माहितीही जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top