दिनांक 26 May 2020 वेळ 9:18 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » दबंग वन अधिकार्‍याविरोधात श्रमजीवी संघटनेचा आसूड मोर्चा

दबंग वन अधिकार्‍याविरोधात श्रमजीवी संघटनेचा आसूड मोर्चा

  • आदिवासी मजुरांवर वन अधिकारी तोंडे यांनी पिस्तूल रोखल्याचा आरोप
  • कारवाई करण्याच्या मागणीसाठी काढला मोर्चा
  • हजारो आदिवासींचा मोर्चात सहभाग

प्रतिनिधी/वाडा, दि. 13 : मजुरीचे पैसे मागायला गेलेल्या आदिवासी मजुरांवर पिस्तुल रोखल्याचा कथित आरोप असलेले वाडा पश्चिम परिक्षेत्राचे प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप तोंडे यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेतर्फे आज प्रांत अधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला.

तोंडे यांची विक्रमगड येथील वनक्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्ती असून त्यांच्याकडे वाडा पश्चिम विभागाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. मात्र त्यांच्या दबंग कार्यशैलीमुळे सामान्य लोकांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. तसेच बंदुकीच्या जोरावर अशिक्षित आदिवासी जनतेमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न तोंडे करत आहेत, असा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. त्यामुळे तोंडे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी श्रमजीवीने आज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र येथे कोणत्याही अधिकार्‍यांनी मोर्चाची दखल न घेतल्याने श्रमजीवीच्या हजारो कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा पुन्हा खण्डेश्वरी नाका येथील वनविभागाच्या कार्यालयावर वळविला. जोपर्यंत दबंगगिरी करणार्‍या दिलीप तोंडे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

अबिटघर येथील महिला डिसेंबरमध्ये केलेल्या आपल्या कामाचे पैसे मागायला गेल्या असता येथील वन परिक्षेत्र अधिकारी तोंडे यांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांना पिटाळून लावले. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे.
-विजय जाधव,
श्रमजीवी संघटना

comments

About Rajtantra

Scroll To Top