दिनांक 25 August 2019 वेळ 1:18 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर जिल्ह्यातील थोडक्यात महत्वाच्या बातम्या. (दि. 13/5/2019)

पालघर जिल्ह्यातील थोडक्यात महत्वाच्या बातम्या. (दि. 13/5/2019)

डहाणू : दुचाकी अपघातात 1 ठार

डहाणू, दि. 13 : भरधाव वेगात असलेली दुचाकी अनियंत्रित होऊन झाडाला धडकल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. काल, 12 मे रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चिंचले येथील दोन इसम उधवा-धुंदलवाडी रस्त्याने दुचाकीवरुन चिंचले येथे जात असताना एका वळणावर चालकाचे भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटले. यावेळी दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळल्याने यात दुचाकीवर मागे बसलेल्या इसमाचा मृत्यू झाला. तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान याप्रकरणी कासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.

मनोरमध्ये हिट अ‍ॅण्ड रन, 1 ठार

मनोर, दि. 13 : येथे एका कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार, तर एक जण गंभीर झाला आहे. 11 मे रोजी संध्याकाळी 4.15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरील दोघे एम.एच.04/क्यु. 6396 या क्रमांकाच्या दुचाकीवरुन प्रवास करीत असताना मागुन भरधाव वेगात आलेल्या एम.एच.47/क्यु.6832 या क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, कारचालक दुचाकीला धडक दिल्यानंतर कारसह घटनास्थळावरुन फरार झाला असुन पोलीस उपलब्ध माहितीवरुन कारचालकाचा शोध घेत आहेत.

अज्ञात वाहनाने चिरडल्याने 1 ठार

मनोर, दि. 13 : मनोर येथे घडलेल्या अन्य एका अपघातात अंदाजे 60 ते 65 वर्षे वय असलेल्या एका इसमाचा मृत्यू झाला आहे. 11 मे रोजीच 6.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात वाहनाने सदर इसमाला धडक दिल्यानंतर त्याच वाहनाखाली आल्याने सदर इसमाच्या शरिराचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात मनोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन मृत इसमाची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

मोखाडा : विषारी औषधामुळे 6 जनावरांचा मृत्यू

मोखाडा, दि. 13 : जंगलात चरण्यासाठी सोडलेल्या 6 जनावरांचा चार्‍यासोबत विषारी औषध खाल्ल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असुन यात चार गाई, एक बैल व एका बकरीचा समावेश आहे. या जनावरांच्या मालकाने 10 मे रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास आपली जनावरे येथील एका जंगलात चरण्यासाठी सोडली होती. मात्र काही तासांतच त्यातील चार गाई, एक बैल व एका बकरीचा मृत्यू झाला. या जंगल परिसरात अज्ञात आरोपीने जाणुनबुजून विषारी औषध टाकल्याची तक्रार मृत जनावरांच्या मालकाने केली असुन त्यानुसार मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई व अर्नाळ्यात चेन स्नॅचिंग

वसई, दि. 13 : वसई तालुक्यात घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या विविध घटनेत दोन महिलांच्या गळ्यातील लाखोंचे दागिने दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले आहेत. यातील एक घटना 11 मे रोजी रात्री 9.45 च्या सुमारास तर दुसरी घटना 12 मे रोजी सकाळी 7.45 च्या सुमारास घडली. वसई येथील 58 वर्षीय महिला रात्री 9.45 च्या सुमारास आपल्या पतीसोबत पायी चालत घरी परतत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने तिच्या गळ्यातील मंगळसुत्र खेचून पोबारा केला. तर अर्नाळ्यातही अशाच प्रकारे 57 वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकण्यात आले. मात्र यावेळी मंगळसुत्राचे दोन तुकडे झाल्याने अर्धवट मंगळसुत्र घेऊनच चोरट्यांनी पोबारा केला. याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असुन अधिक तपास सुरु आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top