डहाणू तालुक्याला पुन्हा भुकंपाचे सौम्य धक्के!

0
16

वार्ताहर/बोईसर, दि. 12 : पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यातील काही गावांमध्ये सततच्या बसणार्‍या भूकंपाच्या धक्क्यांनी मागील काही दिवसांपासुन विश्रांती घेतल्याने येथील नागरीकांमधील भीतीचे वातावरण काहीप्रमाणात निवळले होते. मात्र काल, शनिवारी रात्रीपासुन रविवार सकाळपर्यंत डहाणू तालुक्यातील काही गावांमध्ये पुन्हा भुकंपाचे 7 ते 8 सौम्य धक्के बसल्याचे कळते.

डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी, बहारे, वंकास, चिंचले, हळदपाडा, आंबोली, सासवद, शिलोंढे आदी गाव पाड्यांना यावर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान अनेकवेळा भुकंपाचे लहान-मोठे धक्के बसले. यात 4.41 रिश्टर स्कलच्या सर्वाधिक मोठ्या भुकंपाची देखील नोंद आहे. या धक्क्यांमुळे येथील नागरिक भयभीत होऊन जीव मुठीत धरून दिवस काढत होते. काहींनी भूकंपाच्या भीतीने घरे सोडून शहराकडे धाव घेतली. तर काहींनी तात्पुरत्या स्वरुपात बांधलेल्या तंबूमध्ये संसार थाटला होता. येथील अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे देखील बंद केले होते. असे असताना मागील काही दिवसांपासुन या भुकंपाच्या धक्क्यांनी विश्रांती घेतल्याने नागरीकांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा डहाणू तालुक्यातील काही गावांमध्ये भुकंपाचे धक्के जाणवले असुन काल, शनिवारी रात्रीपासुन ते रविवार सकाळपर्यंत 7 ते 8 धक्के जाणवल्याचे येथील नागरीकांनी सांगितले. दरम्यान, याबाबत येथील नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता भुकंपाच्या सौम्य धक्क्यांची आता सवय झाल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी या भुकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा एकदा नागरीकांची चिंता वाढवली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments