दिनांक 21 February 2020 वेळ 11:29 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वज्रेश्वरी देवी मंदिरात धाडसी दरोडा, आठ ते दहा लाखांचा ऐवज चोरला

वज्रेश्वरी देवी मंदिरात धाडसी दरोडा, आठ ते दहा लाखांचा ऐवज चोरला

प्रतिनिधी/कुडूस, दि. 12 : महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी देवी मंदिरात शुक्रवारी पहाटे दरम्यान पाच ते सहा दरोडेखोरांच्या टोळीने देवीच्या मुख्य गाभार्‍यातील तीन दानपेट्या आणि दुसर्‍या गाभार्‍यातील दोन दानपेट्या फोडून सुमारे आठ ते दहा लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली असून मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

शुक्रवारी पहाटे तीन ते साडे तीन वाजेच्या दरम्यान पाच ते सहा दरोडेखोरांच्या टोळीने मंदिराच्या मागच्या बाजूने मंदिरात प्रवेश केला. यावेळी मंदीर सुरक्षेसाठी असलेल्या एकमेव सुरक्षारक्षकाचे त्यांनी दोरीने हात पाय बांधून देवीच्या मुख्य गाभार्‍यातील कुलूप तोडले. यानंतर तीन दरोडेखोरांनी देवीच्या मुख्य गाभार्‍यात प्रवेश करून कतावणी आणि स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने तीन दानपेट्या आणि पहिल्या गाभार्‍यातील दोन दानपेट्या फोडून त्यातील सुमारे आठ ते दहा लाख रुपयांची रक्कम गोणींमध्ये भरून पसार झाले. या घटनेनंतर सुरक्षारक्षकाने कशीबशी आपली सुटका करून घेत मंदिराच्या पायथ्याशी राहणार्‍या विश्वस्त गोसावी यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी गावातील ग्रामस्थांना आणि पोलिसांना कळविले. तेव्हा या धाडसी दरोड्याची माहिती सर्वत्र वार्‍यासारखी पसरली. हा सर्व प्रकार मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

वज्रेश्वरी देवी मंदिराचा नुकताच तीन ते पाच मे दरम्यान वार्षिक यात्रोउत्सव पार पडला आणि त्यामुळे दानपेट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांनी दान टाकले होते. दरोडेखोरांनी या उत्सवाचा फायदा घेत मंदिराची आणि परिसरातील रस्त्यांची रेकी केली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान एवढा मोठा दरोडा पडूनही देवस्थानाचे वंश परंपरागत विश्वस्त गोसावी या ठिकाणी राहत असल्याने ते सोडून दुसरा एकही विश्वस्त उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. तसेच गावातील हार फुल विक्रत्यांसह इतर व्यापार्‍यांनी आपआपली दुकाने बंद करून देवी मंदिराच्या पायथ्याशी जमून या घटनेचा जाहीर निषेध केला व विश्वस्तांच्या हलगर्जीपणामुळेच हा दरोडा पडला असल्याची भावना व्यक्त केली.

याआधी मंदिराच्या परिसरात असलेल्या दत्त मंदिर, हनुमान मंदिर, गोधदे महाराज समाधी या ठिकाणी देखील चोर्‍या झालेल्या आहेत आणि त्यांचा पूर्ण तपासही नीट झालेला नाही. त्यामुळे या घटनांनंतरही विश्वस्त मंडळाने सुरक्षा व्यवस्थेची कोणतीही खबरदारी घेतली नाही आणि एवढ्या मोठ्या मंदिराची सुरक्षा व्यवस्था फक्त एका सुरक्षारक्षकावर सोपविल्याने संताप व्यक्त होत आहे. या सर्व बाबींमुळे स्थानिक ग्रामस्थांनी रोष व्यक्त करत या घटनेची सखोल चौकशी करून दरोडेखोरांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले, गणेशपुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम लोंढे आदी पोलीस अधिकार्‍यांसह स्थानिक आमदार शांताराम मोरे यांनी मंदिराला भेट देऊन पाहणी केली. तसेच लवकरात लवकर दरोडेखोर पकडण्यात येतील, अशी ग्वाही पोलीस अधिकार्‍यांनी दिली.

comments

About Rajtantra

Scroll To Top