दिनांक 25 August 2019 वेळ 1:24 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » जव्हार तालुक्यातील 23 गावपाड्यांत पाणीटंचाई

जव्हार तालुक्यातील 23 गावपाड्यांत पाणीटंचाई

  • 6 टँकरने पाणी पुरवठा सुरु!
  • 4 गावांचे टँकरसाठी नवीन प्रस्ताव

प्रतिनिधी/जव्हार, दि. 7 : तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पाणी टंचाईच्या झळा अधिक वाढल्या असून या वर्षी तालुक्यातील 23 गाव-पाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. दरम्यान या टंचाईग्रस्त गावपाड्यांमध्ये 6 टँकरने दिवसाआड प्रमाणे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. तर आणखी 4 टंचाईग्रस्त गावांचे टँकरने पाणी पुरवठा करण्याचे प्रस्ताव जव्हार पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे आले आहेत.

तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांपैकी खरंबा, पाचबुड, सागपणा, रिटीपाडा, कासटवाडी, जांभळीचामाळ, जुनी जव्हार, कातकरीपाडा या गावांना यावर्षी मार्च महिन्यापासूनच भीषण पाणी टंचाईला सामारे जावे लागले आहे. त्यामुळे मे महिना काढायचा कसा? असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. ज्या गावांमध्ये पाणी टंचाईला सुरवात झाली आहे त्या गावातील विहिरींनी देखील तळ गाठला आहे. यावर उपाययोजना म्हणून जव्हार पंचायत समितीने सहा टँकरने दिवसाआड पिण्याचे पाणी पुरवठा करण्यास सुरवात केली आहे. तर कौलाळे, पवारपाडा, कुंडाचापाडा, नंदनमाळ, घिवंडा, पिंपळपाडा, न्याहाळे आदी गावांमध्येही पाणी टंचाई सुरु झाल्याने या गावातील ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.

यावर्षी मार्च महिन्यापासून पाणी टंचाईला सुरवात झाली आहे. त्यातच वातावरणात उकाड्याचे व उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने पाणी टंचाईची तीव्र झळ बसू लागली आहे. मागील वर्षी तालुक्यात 7 गावपाडे पाणी टंचाईग्रस्त होते. मात्र यंदा मागील वर्षाच्या तुलनेत तिप्पट म्हणजेच 23 गावपाड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या गावांतील नागरीकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असतानाच जनावरांसाठी लागणार्‍या पाण्याचाही प्रश्‍न त्यांना भेडसावू लागला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ व शेतकर्‍यांना आपल्या जनावरांना नदीकाठी हाकलून देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

दरम्यान, पिण्याच्या पाण्याचा दिवसाआड टँकरने पाणी पुरवठा होत असल्याने हंडाभर पाण्यासाठी वाद देखील निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top