दिनांक 25 August 2019 वेळ 1:58 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाड्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच!

वाड्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच!

डझनभराहून अधिक घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास

घरफोडीच्या ठिकाणाची पाहणी करताना पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे.

प्रतिनिधी/वाडा, दि. 6 : तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असुन सोनाळे परिसरात शनिवारी (दि. 4) रात्री एकाच वेळी डझनभर घरे चोरट्यांनी फोडून साधारण 61 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याच्या घटनेनंतर काल, रविवारी रात्री पुन्हा चोरट्यांनी वाडा शहरातील शिवाजी नगर परिसरात दोन घरफोड्या करून हिरे व सोन्याचे दागिने, असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या नित्याच्याच चोर्‍यांमुळे तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहेत.

वाडा तालुक्यात गेल्या दोन महिन्यात चोरट्यांनी अक्षरशः हौदोस घातला असून वाडा शहर, गोर्‍हे, नाणे, कुडूस, मेट, शिरीषपाडा, वावेघर, नेहरोली आदी ठिकाणी घरे, दुकाने फोडल्याच्या व दुचाकी वाहने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे खूपरी येथील घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. विशेषतः गोर्‍हे येथील दुकानदार प्रकाश खिलारे यांच्या दुकानात चोरी झाल्याने या धसक्याने खिलारे यांचा हृदयविकाराने जागीच मृत्यू झाला आहे. या सर्व घटनांनी तालुक्यातील नागरिक धास्तावले असून गुन्हेगारांना कधी चाप बसेल याच्या प्रतिक्षेत आहेत.

दरम्यान, शनिवारी (दि. 4) रात्रीच्या सुमारास सोनाळे परिसरातील मोज येथील तीन घरे, बिलघरमधील आठ घरे व सोनाळ्यामधील एक घर अशी एकूण 12 घरे फोडून घरातील लहानसहान चांदी व सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम मिळून एकूण 61 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या घरफोड्यांमध्ये नामदेव पठारे, बाळकृष्ण पठारे, एकनाथ गव्हाळे, भास्कर गव्हाळे, सुभाष गव्हाळे, बबन जोगमार्गे, शांता शांताराम पठारे, काशिनाथ गव्हाळे, किसन दळवी, वैभव पठारे व मनोहर घागस यांच्या घरांचा समावेश असून हे सर्व नोकरी धंद्यानिमित्त विविध शहरात राहात असल्याने या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी सदर घरांवर डल्ला मारला आहे.

तर रविवारी (दि. 5) वाडा शहरातील शिवाजी नगर येथे राहणारे उदय नाईक व कल्पना ठाकरे यांची घरे फोडून नाईक यांच्या घरातील एक हिर्‍यांचा पावणेतीन लाख रुपये किंमतीचा हार, दोन अंगठ्या, कानातील कर्नफुले व 40 हजार रुपये रोख रक्कम तर ठाकरे यांच्या घरातील एलसीडी टिव्ही व किरकोळ सामान असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

याप्रकरणी वाडा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

तालुक्यात लग्न सराई जोरदारपणे सुरू आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत नागरिकांची परिसरांमध्ये रेलचेल असते. परंतु पोलिसांच्या नाका बंदी व गस्तीमुळे सामान्य नागरिकालाही पोलिसांच्या चौकशीला व कारवाईला सामोरे जावे लागत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे खरे गुन्हेगार मोकाट फिरत असल्याने त्यांना पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असून लवकरात लवकर या चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी सामान्य नागरिक करीत आहेत.

नाकाबंदी कडक करण्यात आली असून पोलिसांची गस्तही वाढविण्यात आली आहे. गुन्हेगारांना आम्ही लवकरात लवकर जेरबंद करु. मेट येथील चोरीत एका संशियताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून अन्य चोर्‍यांची उकल होण्याची शक्यता असल्याचे वाडा पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी सांगितले.

comments

About Rajtantra

Scroll To Top