सेफ्टी टँकची सफाई करताना तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू!

0
457

राजतंत्र न्यूज नेटवर्क/नालासोपारा, दि. 3 : येथील एका इमारतीच्या सेफ्टी टँकची सफाई करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा विषारी वायूमुळे गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुनिल चावरीया, बरिका कॅसन बुंबक व प्रदीप सरवटे मियासन अशी मृत कामगारांची नावे असुन याप्रकरणी इमारतीचा बिल्डर व सुपरवायझरसह संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल, 2 मे रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास नालासोपारा पश्‍चिमेकडील निलमोरे येथील आनंद व्ह्यू या इमारतीच्या सेफ्टी टँकची (टाकी) साफ-सफाई करण्यासाठी पहिले एक मजूर टँकमध्ये उतरला होता. सफाईचे काम सुरु केल्यानंतर काही वेळातच टाकीतील विषारी वायूमुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले व तो तिथेच गुदमरुन बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी आणखी दोन जण टाकीत उतरले. परंतु त्या दोघांनाही आतमध्ये गुदमरु लागल्यामुळे तिघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, कामगारांना काम करताना सेफ्टीबेल्ट, ऑक्सिजन कीट, शिडी आदी सुरक्षिततेचे साहित्य न पूरवल्यामुळे संबंधित इमारतीचा बिल्डर व सुपरवायझरसह संबंधितांविरोधात नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 304 (अ), 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन नालासोपारा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments