दिनांक 25 August 2019 वेळ 1:34 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » राज ठाकरे व शरद पवारांबद्दल बदनामीकारक पोस्ट टाकणारा इसम मनोरुग्ण

राज ठाकरे व शरद पवारांबद्दल बदनामीकारक पोस्ट टाकणारा इसम मनोरुग्ण

राजतंत्र न्यूज नेटवर्क/नालासोपारा, दि. 19 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत फेसबुकवर धमकी व बदनामीकारक पोस्ट टाकणारा नालासोपारा येथील इसम मनोरूग्ण असल्याची माहिती पालघर जिल्हा पोलिसांतर्फे देण्यात आली आहे.

मंगळवारी (दि. 16) रात्री 12.04 वाजता शरद पवार यांच्याबाबत बदनामीकारक मजकुर लिहितानाच त्यांना इंजेक्शन देऊनच ठार मारणार, अशा गंभीर वाक्याची पोस्ट नालासोपारा येथील एका इसमाने फेसबुकवर टाकली होती. यावरुन मोठा गोंधळ निर्माण झालेला असतानाच दुसर्‍या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नालासोपारा शहर अध्यक्षांनी स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवर राज ठाकरेंबाबत टाकलेल्या पोस्टवरही सदर इसमाने आक्षेपार्ह भाषेत प्रतिक्रिया दिल्याने वातावरण अधिकच तापले होते. त्यामुळे सदर इसमावर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी व मनसेतर्फे करण्यात आल्यानंतर सदर इसमाविरोधात तुळींज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी सदर इसमाचा शोध घेतला असता शरद पवार व राज ठाकरेंबाबत धमकी व बदनामीकारक पोस्ट टाकणारा इसम एकच असुन तो मनोरुग्ण असल्याचे त्याच्या चौकशीतून पुढे आले. मिळालेल्या माहितीनुसार, महेश खोपकर असे सदर इसमाचे नाव असुन पोलिसांनी त्याच्यावर उपचार सुरु असलेल्या डॉक्टरांकडेही चौकशी केल्याने तो मनोरुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, सार्वत्रिक निवडणुकांसाठी पालघर पोलीस 24 तास सतर्क व सज्ज असुन कोणीही कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवु नये, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ पालघर पोलीस नियंत्रण कक्ष किंवा नजिकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असेही पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे.

नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक :

8669604100,
9730711119,
9730811119

comments

About Rajtantra

Scroll To Top