दिनांक 25 August 2019 वेळ 1:52 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » आचारसंहितेचे पालन व मतदारांसाठीच्या सुविधांचा जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आढावा

आचारसंहितेचे पालन व मतदारांसाठीच्या सुविधांचा जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आढावा

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 19 : लोकसभेच्या पालघर मतदारसंघातील निवडणुक अंतिम टप्प्यात आली असून आचारसंहितेचे पालन होण्यासाठी सर्व समन्वय अधिकार्‍यांनी दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले. काल, गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मतदारांसाठी दिल्या जाणार्‍या सुविधांचाही आढावा घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदिप कळंबे यांच्यासह संबंधित सर्व समन्वय अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

डॉ. नारनवरे म्हणाले, विधानसभा क्षेत्रनिहाय सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी आपली भरारी पथके अधिक सजग करावित. उमेदवारांचा प्रचार, तात्पुरती कार्यालये, रॅली, सभा, बैठका आदींवर आचारसंहितेचे पालन आणि खर्च यादृष्टीने बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. पोलीस दलाने चेकपोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत करावित. राजकीय, तडीपार गुन्हेगारांबरोबरच प्रतिबंधात्मक कार्यवाही झालेल्यांवर विशेष लक्ष ठेवून आतापर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यांवर गतीने कार्यवाही करावी. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंदोबस्त आराखडा तयार करण्यात यावा. इतर सर्व पथकांच्या समन्वय अधिकार्‍यांनी आपापली कामे चोखपणे पार पाडावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

मतदारांसाठीच्या सुविधांचा आढावा

निवडणूक आयोगाने मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी अकरा प्रकारच्या सुविधा देणे बंधनकारक केले आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना डॉ. नारनवरे यांनी यावेळी दिल्या. मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान व्हावे यादृष्टीने मतदार जागृती पथके करीत असलेल्या कामांचे कौतुक करून त्यांनी विशेषत: दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याचे तसेच त्यांचे 100 टक्के मतदान होईल यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. यादृष्टीने जिल्ह्यात आतापर्यंत 285 व्हीलचेअर्स उपलब्ध झाल्या असून मतदान केंद्रांवर रँप तयार करण्यात येत असल्याची माहिती समन्वय अधिकार्‍यांनी दिली. पहिल्या किंवा दुसर्‍या मजल्यावर मतदान केंद्र असलेल्या इमारतींमध्ये डोली उपलब्ध करून देण्यात येणार असून दिव्यांग मतदारांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

comments

About Rajtantra

Scroll To Top