दिनांक 25 August 2019 वेळ 2:37 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा तालुक्याचा एमएमआरडीएत समावेश करण्यासाठी प्रयत्नशील! -कपिल पाटील

वाडा तालुक्याचा एमएमआरडीएत समावेश करण्यासाठी प्रयत्नशील! -कपिल पाटील

प्रतिनिधी/वाडा, दि. 19 : वाडा तालुक्याचा मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रात समावेश करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यातून भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागाच्या धर्तीवर वाडा तालुक्यातही सिमेंट काँक्रीटचे रस्ते उभारण्याबरोबरच विकासकामे होतील, असे आश्वासन महायुतीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांनी दिले. वाडा तालुक्याच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही देखील खासदार पाटील यांनी यावेळी दिली.

भाजप, शिवसेना, श्रमजीवी संघटना, रिपाइं (आठवले गट), श्रमजीवी संघटना, कुणबी सेना यांच्या महायुतीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी वाडा तालुक्यात आज रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान खासदार कपिल पाटील यांनी विविध गावांमध्ये नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे, नगराध्यक्षा गितांजली कोलेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पाटील, भाजपाचे लोकसभा विस्तारक बाबाजी काठोळे आदी उपस्थित होते.

पाटील यांच्या वाडा तालुक्याच्या दौर्‍याला गणेशपूरी येथील नित्यानंद बाबांच्या मंदिरात दर्शन घेऊन प्रारंभ करण्यात आला. यानंतर त्यांनी मंदिराबाहेरील विक्रेत्यांबरोबर संवाद साधला. येथून निघालेली रॅली निंबवली, गोराड, केळठण, डाकीवली, कुडूस, नेहरोली, गांध्रे अशी मार्गक्रमण करत पाली येथे पोचली. रॅलीदरम्यान खासदार पाटील यांनी काही गावांमध्ये थेट ग्रामस्थांशी संवाद साधत आगामी काळातील योजनांची तसेच वाडा तालुक्यात केलेल्या विकास कामांची थोडक्यात माहिती दिली.

एमएमआरडीएमध्ये वाडा तालुक्याचा समावेश करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यातून थेट एमएमआरडीएच्या निधीतून तालुक्यात पायाभूत सुविधा पुरविता येतील. भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात एमएमआरडीएच्या माध्यमातून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे जाळे उभे राहिले. त्याच धर्तीवर वाडा तालुक्यातील रस्त्यांचा विकास करण्यात येईल, असे आश्वासन खासदार कपिल पाटील यांनी दिले.

खासदार पाटील यांनी वाडा येथील शंकराच्या मंदिरातही दर्शन घेतले. त्यानंतर तिळसा, मोज आणि शिरीषपाडा गावातील ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. यावेळी अनेक नागरिकांनी कपिल पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांसह रॅलीचे स्वागत करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना रणरणत्या उन्हाचाही काही काळ विसर पडल्याचे यावेळी पाहायला मिळाले. भाजप-शिवसेनेबरोबरच कुणबी सेना, रिपब्लिकन पार्टी व श्रमजीवी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांसह तालुक्यातील पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.

वाडा बसस्थानकात एसटीतील प्रवाशांशी संवाद

वाडा तालुक्यात एसटी हे प्रवासाचे मुख्य साधन आहे. या पार्श्वभूमीवर एसटीने प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार कपिल पाटील यांनी वाडा एसटी स्टॅण्डला भेट दिली. तसेच एका बसमधील प्रवाशांशी संवाद साधून प्रवास केला. आगामी काळात वाडा तालुक्यातील ग्रामीण भागाबरोबरच कल्याण व ठाण्याकडे जाणारी चांगली सेवा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन खासदार पाटील यांनी याप्रसंगी दिले. त्याचबरोबर देशाच्या विकासासाठी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top