दिनांक 05 December 2019 वेळ 8:03 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » कुणबी समाज काँग्रेसच्या पाठीशी -सुरेश टावरे

कुणबी समाज काँग्रेसच्या पाठीशी -सुरेश टावरे

प्रतिनिधी/वाडा, दि. 17 : भिवंडी लोकसभा मतदार संघातील कुणबी समाज हा कायम काँग्रेस विचारधारेशी जोडलेला आहे. स्वार्थासाठी कुणबी सेनेचे नेते विश्वनाथ पाटील काँग्रेस पक्ष सोडून विरोधकांना मिळाले असले तरी हा समाज मात्र आपल्या पाठीशी असल्याचे उद्गार काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांनी वाडा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात काढले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, बहुजन विकास आघाडी, रिपाई (कवाडे गट) आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचारार्थ येथील पटारे मंगल कार्यालयात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना टावरे बोलत होते.

आपण खासदार असताना पक्षाने उमेदवारी नाकारून विश्वनाथ पाटलांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी आपण पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम केले. मी कुठेही नाराजी व्यक्त केली नाही. या निवडणुकीत मात्र पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केल्याने विश्वनाथ पाटील नाराज झाले व थेट ज्यांच्याकडून पराभव स्विकारला त्यांच्या गोटात सामील झाले हे दुर्दैवी आहे. केवळ स्वार्थासाठी विश्वनाथ पाटील भाजप सोबत गेल्याने कुणबी समाजातच प्रचंड नाराजी असून हा समाज या निवडणुकीत आपल्याच सोबत राहील, असा विश्वास टावरे यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, की विद्यमान खासदार आणि आपल्या कार्यपध्दतीत जमिन अस्मानाचा फरक आहे. माझे कुठलेही जेसीबी डंपर नाही अथवा मी ठेकेदारीही करीत नाही, त्यामुळे सामान्य जनतेला आपल्या कार्यालयाचे दरवाजे कायम खुले राहतात, असे म्हणत त्यांनी खासदार कपिल पाटील यांचे नाव न घेता त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधावर टिका केली.

तर आदिवासी विकास महामंडळाने 394 कर्मचार्‍यांची भरती केली असून त्यामध्ये पालघर व ठाणे जिल्ह्यातील एकाही उमेदवाराला संधी दिली गेली नसल्याचे सांगतानाच या भरती प्रकियेत 150 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा यांनी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्यावर केला. त्याचप्रमाणे भाजप सरकारने सत्तेवर आल्यानंतर गोरगरिबांना खावटी कर्ज वाटले नाही. मात्र त्यांच्या नावावर 361 कोटी कर्ज माफ केल्याचे दाखवून मोठा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप आदिवासी विकास विभागावर करत हे सरकार सर्वसामान्य जनतेला फसवणारे सरकार असल्याची टिका त्यांनी केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी काँग्रेस पक्ष सामान्य जनतेच्या हितासाठी काम करतोय या निवडणुकीद्वारे गरिबांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूने 72 हजार रुपये मदत देणारी न्याय योजना राबवून खर्‍या अर्थाने सामान्य जनतेचे हित साधले जाणार असल्याचे काळे म्हणाले.

नोटा बदलण्यासाठी रांगा लावून छळणार्‍या सरकारला मतदानासाठी रांगा लावून धडा शिकवा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनिष गणोरे यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रेखाताई पष्टे, जिल्हा बँकेचे संचालक निलेश भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस हरिभाऊ पाटील, वाडा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा भारती सपाटे, मनसेचे कांतीकुमार ठाकरे, शेकापचे सचिन मुकणे, बविआचे अनंता भोईर, काँग्रेसचे वाडा तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, पांडुरंग पटारे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top