दिनांक 24 February 2020 वेळ 6:58 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर जिल्ह्यातील थोडक्यात महत्वाच्या बातम्या (दि. 15 एप्रिल)

पालघर जिल्ह्यातील थोडक्यात महत्वाच्या बातम्या (दि. 15 एप्रिल)

राजतंत्र न्यूज नेटवर्क/तलासरी, दि. 15 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरुन अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणार्‍या आणखी एका ट्रकवर तलासरी पोलिसांनी कारवाई करत 40 लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. मागील काही महिन्यांपासुन पालघर जिल्हा पोलिसांनी महामार्गावरील विविध ठिकाणी नाकाबंदी करत आजपर्यंत कोट्यावधींचा गुटखा जप्त केल्याने महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेल्या या गुटख्याची मोठ्या प्रमाणात शेजारील राज्यातून आयात होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

महामार्गावरील आच्छाड चेकपोस्टवर एम.एच. 11/ए.एल. 1973 या क्रमांकाच्या ट्रकवर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सदर ट्रकला संशयावरुन अडवून तपासणी केली असता त्यात 40 लाख रुपये किंमतीचा गुटखा व विविध प्रकारचे तंबाखुजन्य पदार्थ आढळून आले. याप्रकरणी पोलीसांनी ट्रकचालक व त्याच्या साथिदाराला अटक करत त्यांच्याविरोधात तलासरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असुन गुटखा व ट्रक असा एकुण 52 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, शुक्रवारीच तलासरी पोलिसांनी आच्छाड चेकपोस्टवर एका लक्झरी बसमधुन 5 लाखांचा गुटखा जप्त केला होता.

वसई : 1.64 लाखांचा गुटखा पकडला

वसई, दि. 15 : तालुक्यातील कामण-चिंचोटी मार्गावरील भजनलाल डेअरी समोर पोलिसांनी एम.एच. 48/ए.वाय. 1834 या क्रमांकाच्या एका छोटा हत्ती टॅम्पोवर कारवाई करत 1 लाख 64 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. 13 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी टेम्पोचालक सैब रियाज खान याला अटक करण्यात आली असुन त्याच्याविरोधात वालिव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावठी दारु बनविण्यासाठी लागणारा 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

वसई, दि. 15 : येथील वालिव पोलीस स्टेशन हद्दीतील विविध तीन ठिकाणी पोलिसांनी छापा मारुन तयार गावठी दारुसह ही दारु बनविण्यासाठी लागणारा नवसागर मिश्रीत गुळाचा वॉश व इतर साधने असा सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, हे अड्डे चालविणार्‍या आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांच्याविरोधात वालिव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वाणगाव येथे गावठी दारु बनविण्यासाठी लागणारे पदार्थ व गुटखा जप्त!

वाणगाव, दि. 15 : येथील एका गोडाऊनवर पोलिसांनी छापा मारुन मोठ्या प्रमाणावर दारु बनविण्यासाठी लागणारे पदार्थ तसेच गुटखा जप्त केला असुन याप्रकरणी एकाला अटक केली आहे.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कोमपाडा-कंसारवाडा भागातील एका दुकानाच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर गावठी दारु बनविण्यासाठी लागणारे पदार्थ तसेच गुटखा साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. या माहितीवरुन पोलीसांनी 12 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता सदर ठिकाणी छापा मारुन गावठी दारु बनविण्यासाठी लागणारा विविध प्रकारचा 4.17 टन वजनी गुळ, 225 किलो नवसागर तसेच हजारो रुपये किंमतीचे अनेक प्रकारचे तंबाखुजन्य पदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी संबंधित इसमाविरोधात वाणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याला 13 एप्रिल रोजी संध्याकाळी अटक करण्यात आली.

दारु अड्ड्यांवर कारवाई, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

पालघर, दि. 15 : जिल्ह्यातील विविध भागात अवैैधरित्या सुरु असलेल्या दारु अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई करत सुमारे 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन एकुण 5 जणांविरोधात संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. 13 व 14 एप्रिल अशा दोन दिवसात विरार, तुळींज, विक्रमगड व घोलवड आदी पोलीस स्टेशन हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

डहाणु व वसईत 19 जुगार्‍यांना अटक

डहाणू, दि. 15 : डहाणू व वसईतील विविध भागात पोलिसांनी कारवाई करत सार्वजनिक परिसरात जुगार खेळणार्‍या एकुण 19 जणांना अटक केली असुन त्यांच्याकडून सुमारे 70 हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. काल, 14 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास डहाणु पोलीस स्टेशन हद्दीतील सरावली शितला माता मंदिरासमोर रस्त्याच्या कडेला संदिप श्रीधर संकळकर, मनोज लक्ष्मण पटेल, मगन भगवान सुरती, राजेश भिकू धोडी, बबलू रामबालक चौहाण, कृष्णानंद नरसिंग गुप्ता, रमेश रामू धोडी असे 7 जण तीन पत्ती नावाचा जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा मारुन सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दिड हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसई हद्दीतील मामा ढाब्याच्या शेजारी शनिवारी (दि. 15) दुपारी तीनच्या सुमारास अजयकुमार बंसीलाल पाल, अनंत गंगाधर गुट्टे, शमीम हाफिज खान, युवराज ओमकार ब्राम्हणे, अक्रम अब्दुल पठाण, धनराज प्रल्हाद धायगुडे, अतुल बजरंग शिर्के, शंकर रामचंद्र हगवणे, इम्तीयाज गफार मेमन असे 9 जण तीन पत्ती नावाचा जुगार खेळत असताना आढळून आल्याने या नऊही जणांना पोलीसांनी अटक करत त्यांच्याकडील 56 हजार 710 रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. तर वसईतील पाचुबंदर स्मशानाच्या परिसरात रम्मी नावाचा जुगार खेळणार्‍या गणी खुदाबक्ष सरदार, अनिफ अब्दुल फजल शेख व मरफत अलि शेख अशा तिघांना पोलीसांनी अटक केली असुन त्यांच्याकडून 1,250 रुपयांची रक्कम जप्त केली आहे. या सर्व आरोपींविरोधात संबंधित पोलीस स्टेशनमध्ये मुंबई जुगार कायद्याचे कलम 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top