दिनांक 18 June 2019 वेळ 6:56 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » चोरीच्या धक्क्याने व्यापार्‍याचा मृत्यू

चोरीच्या धक्क्याने व्यापार्‍याचा मृत्यू

गोर्‍हे येथील घटना; बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन निषेध

प्रतिनिधी/वाडा, दि. 12 : तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असुन गोर्‍हे-सांगे परिसरात गुरूवारी रात्रीच्या सुमारास एक किराणा दुकान व दोन घरे फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. आज सकाळीच चोरी झालेल्या दुकानाचे मालक प्रकाश खिलारे हे दुकान उघडण्यासाठी गेले असता आपले दुकान फोडलेले दिसल्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन जागीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेने संतप्त झालेल्या व्यापार्‍यांनी बाजारपेठेत कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध नोंदवला.

वाडा तालुक्यात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असुन रोजरोसपणे चोरटे घरे, दुकाने फोडून लाखोंचा ऐवज लंपास करीत आहेत. गुरुवारी रात्रीच्या सुमारास गोर्‍हे येथील प्रकाश खिलारे (वय 45) यांच्या किराणा दुकानात चोरी झाली. सकाळीच खिलारे दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना दुकान फोडलेले दिसले. यावेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. दोन वर्षांत खिलारे यांच्या दुकानात ही चौथी चोरी झाल्याने प्रचंड मनस्तापातून ही घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या चोरीबरोबरच गोर्‍हे नजिक असलेल्या नाणे येथील चंद्रकांत पाटील यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे तीन तोळ्याचे गंठण व 25 हजार रुपये रोख तर संजय घरत यांचे घर फोडून सव्वा तोळ्याचा सोन्याचा हार व पाच हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.

दरम्यान, गोर्‍हे ही आजुबाजुच्या पंधरा ते वीस गाव पाड्यांची बाजारपेठ असून येथे पोलीस दूरक्षेत्र आहे. मात्र अलिकडेच ही चौकी पोलिसांनी कंचाड फाटा येथे स्थलांतरीत केल्याने सहा महिन्यात 20 चोर्‍या झाल्याची माहिती येथील ग्रामस्थ धिरज गोर्‍हे यांनी दिली. तर पोलिसांच्या निष्काळजीपणाचाच हा बळी असल्याचा आरोप तेजस खिलारे यांनी केला आहे.

कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध

गेल्या सहा महिन्यात गोर्‍हे बाजारपेठेत 20 चोर्‍या झाल्या असून या चोर्‍यांचा तपास करण्यात पोलिसांना अपयश आल्याने संतप्त झालेल्या व्यापार्‍यांनी बाजारपेठेत कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध नोंदवला.

comments

About Rajtantra

Scroll To Top