दिनांक 18 June 2019 वेळ 7:11 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर जिल्ह्यातील थोडक्यात महत्वाच्या बातम्या (दी. 11 एप्रिल 2019)

पालघर जिल्ह्यातील थोडक्यात महत्वाच्या बातम्या (दी. 11 एप्रिल 2019)

मनोर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

राजतंत्र न्यूज नेटवर्क/मनोर, दि. 11 : मनोर येथील एका मजुराच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करुन तिला गर्भवती केल्याची घटना उघडकीस आली असुन याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोर पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार, पिडीत मुलीचे आई-वडिल मजुरीच्या कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर आरोपी पिडीतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिचे लैंगिक शोषण करत होता. 3 एप्रिल रोजी पिडीतेच्या पोटात दुखत असल्याने तसेच रक्तस्त्राव होत असल्याने तिला पालघर येथील रुग्णालयात नेल्यानंतर ती गर्भवती असल्याचे समोर आले. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने तिच्या पोटातील अर्भक मृत पावले आहे. पिडीतेच्या वडिलांनी याबाबत पालघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेचे कलम 376 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा 2012 चे कलम 4 नुसार गुन्हा दाखल केला असुन हे प्रकरण मनोर पोलीस स्टेशनमध्ये वर्ग केले आहे. मनोर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

पालघर : एटीएम कार्डाची हेराफेरी करुन 1.32 लाख लुटले!

पालघर, दि. 11 : एटीएम मशीनमधुन पैसे काढून देण्यास मदत करण्याच्या बहाण्याने दोन भामट्यांनी 43 वर्षीय महिलेला 1 लाख 21 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना पालघर येथे घडली आहे. सदर महिला 18 मार्च रोजी आपल्या बहिणीच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये आली होती. यावेळी तिला पैसे काढायला जमत नसल्याचे पाहून दोन अज्ञात इसमांनी तिला मदत करण्याच्या बहाण्याने अगोदर एटीएमचा पासवर्ड बघितला व त्यानंतर तिची नजर चूकवुन एटीएमची अदलाबदल केली. यानंतर सदर भामट्यांनी या एटीएमचा वापर करत विविध एटीएममधुन 1 लाख 32 हजार रुपयांची रक्कम लंपास केली. दोन दिवसांपुर्वी महिलेच्या बहिणीने आपल्या खात्यातील रक्कम तपासल्यानंतर हा प्रकार समोर आला. दरम्यान याप्रकरणी 2 अज्ञात आरोपींविरोधात पालघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.

वसई : 52 लाखांचा गुटखा पकडला

वसई, दि. 11 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसई हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने गुटख्याने भरलेल्या ट्रकवर कारवाई करत 52 लाख 28 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. मंगळवारी (दि. 9) महामार्गावरील पेल्हार फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. गुजराज राज्यातून मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र राज्यात गुटखा आणला जाणार असल्याची माहिती पालघर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पेल्हार फाटा येथे एम.एच.04/जी.सी. 7484 या क्रमांकाच्या संशयित ट्रकला अडवून तपासणी असता त्यात 52 लाख 28 हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. पोलीसांनी गुटखा व ट्रक जप्त केला असुन ट्रकचालकासह संबंधितांवर वसई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

कासा येथे सव्वा लाखांचा गुटखा जप्त

कासा, दि. 11 : कासा पोलीसांनी काल, बुधवारी महामार्गावरील घोळ टोलनाक्यावर वाहनांच्या तपासणीदरम्यान 1 लाख 26 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असुन त्यांच्यावर कासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशीर युनूस मुन्सी (वय 45, रा. गजुरात) व कृष्णा बाबल्या भगत (वय 28, रा. विक्रमगड, जि. पालघर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

मनोर : 98 हजारांचा काळा गुळ जप्त

मनोर, दि. 11 : मनोर पोलिसांनी येथील एका घरात बेकायदेशीररित्या साठा करुन ठेवलेला सुमारे 98 हजार रुपये किंमतीचा काळा गुळ जप्त केला आहे. गावठी दारु बनविण्यासाठी या गुळाचा वापर केला जातो. पोलिसांना मंगळवारी (दि. 9) याबाबत माहिती मिळाल्यानंतर सदर घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात घरातील दोन खोल्यांमध्ये प्लास्टिकच्या गोणीत भरलेला मोठ्या प्रमाणावर काळ्या गुळाचा साठा पोलिसांना आढळून आला. दरम्यान, याप्रकरणी संबंधित इसमाविरोधात मनोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विरार : महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून दुचाकीस्वार फरार

विरार, दि. 11 : बाजारात खरेदी करुन घरी परतत असलेल्या एका 50 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी हिसकावून लंपास केल्याची घटना अर्नाळा येथे घडली आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 9) सदर महिला विरार येथील बाजारातून खरेदी करुन रस्त्याने पायी चालत घरी परतत असताना विरार गार्डन परिसरात दुचाकीवरुन आलेल्या दोघा इसमांपैकी मागे बसलेल्या इसमाने तिच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घटनास्थळावरुन पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सुरु आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top