
राजतंत्र न्यु नेटवर्क/तलासरी, दि. 10 : घरात होणार्या वादात नेहमी आईची बाजू घेतो म्हणून आपल्या पोटच्या मुलाची कुर्हाडीने घाव घालून हत्या करणार्या आरोपी पित्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुरेश लक्ष्मण धोडी असे आरोपीचे नाव असुन 4 वर्षांपुर्वी त्याने आपल्या मुलाची हत्या केली होती

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश धोडी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी तिच्यासोबत वाद घालायचा तसेच तिला मारहाण करायचा. या वादात त्याचा मुलगा नितीन नेहमी आईची बाजू घेत असल्याने सुरेश धोडीचा त्याच्यावर राग होता. चार वर्षांपुर्वी याच वादावादीतून धोडी याने पत्नीवर कुर्हाडीने जीवघेणा हल्ला केला असता नितीन आईला वाचवण्यासाठी पुढे आला. यावेळी संतापलेल्या सुरेश धोडीने नितीनच्या मानेवर कुर्हाडीने घाव घालून त्याचा खून केला होता. तर या हल्ल्यात सुरेशची पत्नी देखील गंभीररत्या जखमी झाली होती. या घटनेनंतर त्याच्याविरोधात तलासरी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 302, 307, 326 व 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी तलासरी पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस अधिकारी हरी बालाजी यांनी अधिक तपास करत आरोपीविरोधात सबळ पुरावे गोळा करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या पुराव्यांना ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी सुरेश धोडी याला 302 कलमाखाली जन्मठेप तसेच 1 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने कारावास, 307 कलमाखाली 10 वर्षे कारावास तसेच 1000 रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने कारावासाची शिक्षा तर 324 कलमाखाली 3 वर्षे कारावास तसेच 500 रुपये दंड व दंड न भरल्यास 3 महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.