पद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर

0
23

ठाणे, दिनांक १० एप्रिल: पद्मभूषण ताराताई मोडक पुरकार – २०१९ साठी ” आनंद निकेतन ” (नाशिक) या संस्थेची आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार – २०१९ साठी श्रीमती सुचिता सोळंके (कारंजा- वाशिम) यांची निवड झाल्याची घोषणा नूतन बाल शिक्षण संघाचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर यांनी ठाणे येथे आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये केली. यावेळी संघाचे विश्वस्त श्रीराम पटवर्धन, सुधीर कामत व संजीव जोशी उपस्थित होते. १९ एप्रिल रोजी ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पुरस्करांचे वितरण होणार असून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या (ठाणे) प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन केलेल्या नूतन बाल शिक्षण संघ या संस्थेच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया रचणाऱ्या देशाच्या बालशिक्षणतज्ञ पद्मभूषण ताराताई मोडक व त्यांना सावलीची साथ देणाऱ्या समाजसेविका पद्मश्री अनुताई वाघ यांचे कार्य सर्वश्रुत आहे. आदिवासी व मागास समाज देखील पूर्व प्राथमिक शिक्षणापासून वंचीत राहू नये या भूमिकेतून त्यांनी डहाणू सारख्या आदिवासी बहुल तालुक्यात मोठे योगदान दिले. अंगणवाडीच्या जनक ताराताई यांनी अनूताईंच्या साथीने डहाणू तालुक्यातील कोसबाड टेकडीवरून केलेले शिक्षणाचे प्रयोगही सर्वपरिचित आहेत. त्यांच्या कार्यामुळे शिक्षणक्षेत्रातील व्यक्तींना प्रेरणा मिळत असते. त्यांच्या या गौरवशाली कार्याचा वारसा त्यांच्यानंतरही संस्था पुढे चालवित आहे. त्यांच्या पासून स्फूर्ती आणि उर्जा घेऊन शिक्षण क्षेत्रात अशाच प्रकारचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांचा गौरव करून त्यांचे कार्य सर्वदूर पोहोचावे व त्यांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच शिक्षण क्षेत्राला उर्जा मिळावी या हेतूने संस्थेतर्फे पद्मभूषण ताराताई मोडक यांच्या १२५ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून सन २०१७ पासून पुरस्कार सुरु केले. ताराताईंच्या स्मरणार्थ एक संस्था व पद्मश्री अनुताई वाघ यांच्या स्मरणार्थ एक व्यक्ती यांना प्रत्येकी २५ हजार रूपये आणि मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. दरवर्षी ताराताईंच्या जयंती दिनी १९ एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

ज्येष्ठ पत्रकार तथा झी २४ तास वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक श्री. विजय कुवळेकर आणि मॉर्डन कॉलेज (पुणे) चे माजी प्राचार्य श्री. अनंत गोसावी यांची २ सदस्यीय निवड समिती पुरस्कार्थीची निवड करण्याची जबाबदारी पार पाडत आहे.

२०१७ मध्ये पुणे येथे पार पाडलेल्या कार्यक्रमात श्री. प्रमोद देशमुख संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी (नांदेड) या संस्थेस पद्मभूषण ताराताई मोडक पुरस्कार व श्री. वामनराव अभ्यंकर (पुणे) यांना पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून श्रीमती मीना चंदावरकर व प्रा. मीनाताई गोखले उपस्थित होत्या.

२०१८ मध्ये मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सरस्वती मंदीर ट्रस्ट (ठाणे) या संस्थेस पद्मभूषण ताराताई मोडक पुरस्कार व सौ. रेणू राजाराम दांडेकर (दापोली) यांना पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास डॉ. विजया वाड व प्रा. डॉ. विणा सानेकर प्रमुख पाहूणे उपस्थित राहीले होते.

पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन ठाणे येथे :
२०१९ च्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन सहयोग मंदीर हॉल, घंटाळी (ठाणे) येथे सायंकाळी ५.०० वाजता आयोजित करण्यात आले असून कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या (ठाणे) प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे.

पुरस्कार्थींची संक्षिप्त माहिती:
आनंद निकेतन मधून अहिंसक, समता, न्याय व शाश्वत समाजाच्या निर्मितीसाठी पारंपारीक गुण स्पर्धेला फाटा देऊन परसबाग आणि दैनंदिन व्यवहाराचे शिक्षण दिले जाते. श्रम आधारीत अनुभवातील शिक्षण देण्यावर भर देणारी आनंद निकेतन ही शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशाळा आहे.

श्रीमती. सुचिता सोळंके यांनी उपेक्षीत फासे पारधी समाजात जन्माला आल्यानंतर गरीबीमुळे ७ वी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर फासे पारधी मुलांसाठी झाडाखाली अंगणवाडी सुरू करून समाजाला मूख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. समाजासाठी सर्व स्तरातून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांतून सूचिता यांना गावच्या सरपंच होण्याचा मान देखील मिळाला होता.

Print Friendly, PDF & Email

comments