दिनांक 18 January 2020 वेळ 11:09 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर जिल्ह्यातील थोडक्यात महत्वाच्या बातम्या (9 एप्रिल 2019) :

पालघर जिल्ह्यातील थोडक्यात महत्वाच्या बातम्या (9 एप्रिल 2019) :

महामार्गावरील तलासरी हद्दीत पावणे चार लाखांचा गुटखा जप्त, चौघे अटकेत

राजतंत्र न्यूज नेटवर्क/तलासरी, दि. 9 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तलासरी हद्दीत नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणार्‍या एका चारचाकी व दुचाकीवर कारवाई करत सुमारे पावणे चार लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी एकुण 4 जणांना अटक करण्यात आली असुन त्यांच्याविरोधात तलासरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल, सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास महामार्गावरील दापचरी चेकपोस्टवर पोलीस वाहनांची तपासणी करत असताना स्विफ्ट कार व होन्डा अ‍ॅक्टिवा दुचाकीवरुन प्रवास करणार्‍या दोघांकडे एकुण 3 लाख 79 हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. यानंतर पोलीसांनी गुटख्यासह दोन्ही वाहने जप्त करत कारचालक व त्याचा साथिदार तसेच दुचाकीरीवरील दोघांना अटक केला आहे. तसेच त्यांच्याविरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 328,188,272,273 सह अन्न सुरक्षा मानदे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

विरार : 1 लाखांची रक्कम केली लंपास

विरार, दि. 9 : बँकेतून पैसे काढलेल्या इसमाच्या अंगावर घाण फेकून त्याच्याकडील 1 लाखांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून चोरट्याने पोबारा केल्याची घटना विरार येथे घडली असुन याप्रकरणी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विरार पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार, काल सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास फिर्यादी इसमाने विरार पश्‍चिमेतील बँक ऑफ बडोदा बँकेतून 1 लाखांची रक्कम काढली होती. यानंतर रक्कम बॅगेत ठेऊन फिर्यादी विरार स्टेशनकडे जात असताना चोरट्याने त्याच्या अंगावर घाण फेकली. यात शर्टची कॉलर घाण झाल्याने तसेच अंगाला खाज येऊ लागल्याने फिर्यादीने रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानचालकाकडून पाणी घेऊन शर्ट साफ करत असतानाच चोरट्याने अचानक त्याच्या हातातील पैशांची बॅग हिसकली व आपल्या दुचाकीवरील साथिदाराच्या मदतीने पोबारा केला.

दरम्यान, याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विरार : 2 लाखांची घरफोडी

विरार, दि. 9 : विरार पुर्वेतील एका घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत 2 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पुर्वेतील एका घरातील सदस्य 5 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत दरवाजाची कडी कापून तसेच सेफ्टी दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला व कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, होम थिएटर व रोख रक्कम मिळुन एकुण 2 लाख 7 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी विरार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top