दिनांक 04 July 2020 वेळ 12:20 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » भव्य शोभायात्रा व ढोलताश्यांच्या गजरात वाड्यात नव वर्षाचे स्वागत

भव्य शोभायात्रा व ढोलताश्यांच्या गजरात वाड्यात नव वर्षाचे स्वागत

प्रतिनिधी/वाडा, दि. 6 : हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा वाडा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. शहरात नववर्ष स्वागत समितीच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात व ढोलताश्यांच्या गजरात या शोभायात्रेत पारंपारिक पोशाख परिधान करुन आबालवृद्ध सहभागी झाले होते. तर घरोघरी गुढी उभारून नागरिकांनी मनोभावे पूजा केली आणि गोड पदार्थांचा आस्वाद घेतला.

श्रीराम मंदिर येथून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. पुढे भानुशाली आळी, परळी नाका, बस स्टँड, विठ्ठल मंदिर, गुडलक यंग क्लब, गावदेवी मंदिर व पुन्हा श्रीराम मंदिर अशा मार्गक्रमणानंतर येथे गुढी उभारुन शोभायात्रेची सांगता करण्यात आली. पुरुष व महिलांचे ढोल पथक, पी. जे. हायस्कूलच्या विद्यार्थींनींचे लेझीम पथक, वारकरी तसेच महापुरुषांच्या वेशात चिमुकले शोभायात्रेत सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे, वाड्याच्या नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, उपनगराध्यक्षा भारती सपाटे, भाजपचे पालघर लोकसभा विस्तारक बाबाजी काठोळे, तालुकाध्यक्ष संदीप पवार, गटनेते मनिष देहेरकर, शिवसेनेचे तालुका समन्वयक प्रकाश केणे, शहर प्रमुख नरेश चौधरी, महिला आघाडीच्या संगिता ठाकरे, काँग्रेसचे दिलीप पाटील, शहराध्यक्ष सुशील पातकर, नगरसेवक, नगरसेविका व शहरातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top