दिनांक 18 January 2020 वेळ 11:59 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पिंजाळ नदीवरील बंधार्‍याची जागा बदला

पिंजाळ नदीवरील बंधार्‍याची जागा बदला

सापणे ग्रामस्थांची मागणी, लोकसभा निवडणुकीवर बहिष्काचा इशारा

सापने बु. व कावळे मठ दरम्यान मंजूर झालेल्या बांधार्‍याची जागा.

प्रतिनिधी/वाडा, दि. 3 : पिंजाळ नदीवरील सापने बु. व कावळे मठ दरम्यान मंजूर झालेला बंधारा चुकीच्या जागी बांधला जात असुन नदीलगत असलेल्या गावातील शेतकर्‍यांना व नागरिकांना त्याचा कोणताही उपयोग होणार नसल्याचे सांगत सापणे येथील ग्रामस्थांनी या बंधार्‍याची जागा बदलण्याची मागणी केली आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन छेडून येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

तालुक्यातील सापणे बु. गावाच्या हद्दीमधून साधारण एक किलोमीटर अंतरावरुन पिंजाळ नदी वाहत असून पावसाळ्यात ही नदी दुथडी भरून वाहत असते. मात्र दरवर्षी पावसाळा संपल्यावर साधारणपणे 3 ते 4 महिन्यानंतर नदीचे पात्र कोरडे पडत असते. सापणे गावाला नदी अगदी जवळ असूनही, जलसंधारणा अभावी तथा बंधार्‍याअभावी सापणे बु. गावासह नदीकाठी असणार्‍या अनेक गावांना आणि पाड्यांना दरवर्षी पाण्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. मागील 20 ते 25 वर्षापुर्वी या नदीवर गावातील ग्रामस्थांच्या मदतीने एका बाजूला बंधारा बांधून पाणी अडविण्यात आले होते. मात्र प्रशासनाकडून त्यानंतर कोणतेही सहकार्य प्राप्त न झाल्यामुळे सदर बंधारा जीर्ण होऊन वाहून गेला आहे.

सध्या पिंजाळ नदीवरील सापणे बु. व कावळे मठ दरम्यान बंधारा मंजूर झालेला असून कामाची आखणी करुन बंधार्‍याच्या कामास सुरवात करण्यात आली आहे. मात्र सदर नियोजित बंधारा हा सापणे बु. गावाच्या हद्दीत असून, त्याबाबत सापणे बु. ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता हा बंधारा मंजूर करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच मंजूर असलेला बंधारा हा चुकीच्या जागी बांधला जात असुन त्याचा उपयोग नदीलगत असलेल्या गावातील कोणत्याही शेतकर्‍यांना व नागरिकांनाही होणार नसुन शासनाचे जवळपास 42 लाख रुपये वाया जाणार असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. त्यामुळे सदर बंधारा सध्या नियोजित असलेल्या जागेपासून 300 मीटरने मागे घेण्यात यावा, अशी मागणी गावातील ग्रामस्थांकडून वाडा तहसिलदारांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बंधारा 300 मीटरने मागे घेतल्यास, त्याचा लाभ वाडा तालुक्यातील सापणे बु., करांजे, उमरोठे तसेच विक्रमगड तालुक्यातील कावळा, माळा या गावांसह अनेक पाड्यांना होणार आहे. तरी या सर्व गोष्टींचा विचार करुन बंधार्‍याची जागा बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करुन बंधार्‍याचे काम सुरु केल्यास, त्याविरोधात सापने बु. गावातील ग्रामस्थ, महिलावर्ग तीव्र आंदोलन छेडून या कामास विरोध करणार असल्याचे तसेच आगामी लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकून निषेध नोंदविणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top