दिनांक 18 January 2020 वेळ 11:12 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » खासदार कपिल पाटील यांना शिवसेनेची नाराजी भोवणार?

खासदार कपिल पाटील यांना शिवसेनेची नाराजी भोवणार?

प्रतिनिधी/वाडा, दि. 3 : मागील लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांपासुन दुरावल्याचा तसेच त्यांना विविध प्रकारे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप होत असलेले भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांना वाडा तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून किती मते पदरात पाडून घेता येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भिवंडी लोकसभा मतदार संघात भिवंडी ग्रामीण विधानसभा व शहापूर विधानसभा मिळून वाडा तालुक्यातील 119 मतदान केंद्राचा समावेश असुन तालुक्यात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. जिल्हा परिषदेत 4 सदस्य, पंचायत समितीत 5 सदस्य तर नवनिर्वाचित वाडा नगर पंचायतीत सेनेच्या नगराध्यक्षा असून 6 नगरसेवकही निवडून आले आहेत. त्यामुळे खासदार पाटील यांना शिवसेनेची नाराजी भोवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात आज शिवसेना – भाजप ही एकत्रितरीत्या जरी लोकसभा निवडणूका लढत असली तरी भिवंडी लोकसभा व पालघर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना व भाजप कार्यकर्ते उमेदवार निवडीवरुन अतिशय नाराज असून अशा उमेदवारांचा प्रचार करणार नसल्याचे उघड उघड बोलू लागले आहेत. त्यामुळे शिवसैनिकांच्या नाराजीचा फटका पाटील यांना येणार्‍या निवडणूकीत बसू शकतो. खासदार कपिल पाटील यांच्यावर असलेली शिवसैनिकांची नाराजी आता उघडपणे चर्चेचा विषय होत आहे. शहापूर, भिवंडी, वाडा येथे गुप्त बैठका घेऊन ही नाराजी दूर करण्यासाठी तसेच शिवसैनिकांच्या मनोमिलनासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांना बरोबर घेऊन समेट घडविण्याच्या हालचाली जोरदार सुरु आहेत. मात्र यावेळी भाजपचा एकही कार्यकर्ता सोबत न घेता खासदार स्वतःच फिरत असल्याने वाड्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी कपिल पाटील यांच्या विजयासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. परंतु विजयी झाल्यापासून आजतागायत कोणत्याही शिवसेना पदाधिकारी अथवा शिवसेना कार्यकर्त्याची साधी भेटही खा. पाटील यांनी घेतली नसल्याने व कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात ते कधी सहभागीही झाले नसल्याने शिवसैनिकांमध्ये त्यांच्याबाबत नाराजी आहे. भाजप नेहमीच शिवसेनेला दाबण्याचे कारस्थान करत असून वाडा पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर खासदारांच्या माध्यमातून दबाव तंत्राचा वापर करून खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप वाड्यात शिवसैनिकांच्या भेटीला आलेल्या खासदार कपिल पाटील यांच्या समोर करण्यात आल्याचे समजते.

तसेच वाडा नगर पंचायतीत सत्ताधारी शिवसेनेला भाजप नगरसेवक कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करता नेहमी अडचणीत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याची तक्रारही खासदार कपिल पाटील यांच्याकडे यावेळी करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे वरवर जरी मनोमिलन झाल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्ष कार्यकर्ते किती निष्ठेने काम करतील यावरच खासदार कपिल पाटील यांचे भवितव्य अवलंबून आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top