जिल्ह्यातील चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदार जागृती! -जिल्हाधिकारी

0
10

प्रतिनिधी/पालघर, दि. 31 : लोकसभेच्या निवडणुकांच्या कार्यक्रमानुसार पालघर मतदारसंघात येत्या 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सर्व नागरीकांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून स्विप ( SVEEP-Systematic Voters Education and Electoral Participation) अंतर्गत जिल्ह्यातील 3 हजार शाळांमधील चार लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.

आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करण्यासाठी, मुक्त-नि:पक्षपाती व शांततापुर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे व धर्म, वंश, जात, समाज, भाषा आदी विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्यासाठी आमच्या पालकांना व वडीलधार्‍या व्यक्तींना मतदान करण्यास सांगू, अशी प्रतिज्ञा 26 मार्च रोजी विद्यार्थ्यांनी घेतली. त्यानंतर 27 मार्च रोजी शाळांमधून चित्रकला तर 28 मार्च रोजी रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यासाठी मतदान, शाई लावलेली डाव्या बोटाची तर्जनी आणि भारताचा नकाशा, असे विषय देण्यात आले होते. यास विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

जनजागृतीच्या उपक्रमाचा भाग म्हणून 29 मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. यामध्ये मतदान करण्याबाबत घोषवाक्ये म्हणत त्यांनी मतदारांचे लक्ष वेधून घेतले. तर 30 तारखेला आयोजित वक्तृत्व स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दरम्यान, येत्या मंगळवारी (2 एप्रिल) सर्व शाळांमधून पालक सभेचे आयोजन करण्यात आले असून त्याद्वारे त्यांना लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेचे महत्त्व पटवून सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले जाणार आहे.

या प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहता त्यांना प्रतिसाद देत सर्व मतदारांनी लोकसभा निवडणुकीत अवश्य मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments