भूमिपुत्र बचाव आंदोलन निवडणुकीच्या रिंगणात

0
8

पालघर लोकसभेसाठी उमेदवार केला जाहीर

वार्ताहर/पालघर दि. 28 : आजचे लोकप्रतिनिधी भांडवलदाराचे चमचे झाले असुन गेल्या 70 वर्षात सर्वच राजकीय पक्षांनी जनतेची फसवणूक केली आहे, अशी टिका वजा आरोप करत आज भूमिपुत्र बचाव आंदोलनने पालघर लोकसभा निवडणुक लढवण्याची घोषणा केली असुन दत्ता करबट यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

पालघर येथील मच्छिमार सहकारी संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भूमिसेना-आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळुकाका धोदडे यांनी ही घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, पालघर जिल्ह्यात होऊ घातलेल्या विनाशकारी प्रकल्पांमुळे येथील भुमिपुत्र हद्दपार होणार आहेत. आपले प्रश्‍न मांडण्यासाठी अनेक पक्षांच्या पुढार्‍यांना निवडणुकांमध्ये निवडुन दिले. परंतु आजवर एकाही पुढार्‍याने येथील जनतेला न्याय दिला नाही. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील जनतेवर लादल्या जाणार्‍या विनाशकारी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी भूमिपुत्र बचाव आंदोलनतर्फे दत्ता करबट यांना पालघर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील विविध जन आंदोलनात सहभागी होणार्‍या अनेक संघटना याकामी एकवटल्या असुन स्थानिक उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आल्याचे सांगतानाच यामुळे पालघरमधील जनतेला निवडणुकीमध्ये एक वेगळा पर्याय उपलब्ध झाल्याचेही धोदडे म्हणाले.

जिल्ह्यात होऊ पाहणारे मुंबई-बडोदा एक्सप्रेस वे, वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, सागरी महामार्ग अशा अनेक प्रकल्पांमुळे स्थानिक शेतकरी व मच्छीमार मेटाकुटीला येणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र एकाही राजकीय पक्षाने कधीच खुलेपणाने भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणार्‍या या प्रकल्पांना विरोध केला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक नेतृत्व दिल्लीत पाठवायचे अशी सर्वच स्थानिक भूमिपुत्र आंदोलनाच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे, असेही धोधडे म्हणाले.

दरम्यान, खासदार राजेंद्र गावित यांचे समर्थक व आदिवासी कार्यकर्ते प्रकाश सावर यांनी या पत्रकार परिषदेला उपस्थित राहुन भुमिपुत्र बचाव आंदोलनाला पाठिंबा जाहिर करुन स्वतः च्या फायद्यासाठी पक्ष बदलणार्‍या गावितांवर टिका केली. यावेळी त्यांनी पालघर लोकसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत गावित यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोपही केला.

या पत्रकार परिषदेस शशी सोनवणे, संतोष पावडे, समीर वर्तक, प्रकाश सावर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

Print Friendly, PDF & Email

comments